दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांचे शनिवारी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. शनिवारी सकाळी त्यांना एस्कॉर्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र दुपारी चार वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्या 81 वर्षांच्या होत्या. सध्या शीला दीक्षित यांच्याकडे दिल्ली काँग्रेसची जबाबदारी होती. त्यांच्या निधनामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

गांधी कुटुंबीयांच्या अत्यंत निकटकर्तीय नेत्या अशी त्यांची ओळख होती. दीक्षित यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात दिल्लीत अनेक विकासकामे झाली. त्यांच्याच कार्यकाळात दिल्लीत मेट्रो धावली. दिल्लीचा चेहरामोहरा बदलण्याचे सर्व श्रेय दीक्षित यांना जाते. 31 मार्च 1938 मध्ये पंजाबच्या कपूरथलामध्ये त्यांचा जन्म झाला होता.

दिल्लीच्या कॉन्व्हेंट ऑफ जीझस ऍण्ड मेरी स्कूलमधून त्यांचे शिक्षण झाले. त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस कॉलेजमधून मास्टर्स ऑफ आर्टस्मध्ये त्यांनी पदवी घेतली. राजकारणाबरोबरच सामाजिक क्षेत्रातही त्यांचे फार मोठे योगदान होते.

राष्ट्रपती, पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शीला दीक्षित यांच्या निधनावर दुःख क्यक्त केले आहे. मुख्यमंत्री असताना दीक्षित यांनी दिल्लीचा चेहरामोहरा बदलला. त्यासाठी नेहमीच त्यांचे स्मरण केले जाईल, असे राष्ट्रपतींनी शोकसंदेशात म्हटले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शीला दीक्षित यांचे व्यक्तिमत्व सुस्वभावी होते. दिल्लीच्या विकासात त्यांचे अभूतपूर्क योगदान असल्याचे सांगत टि्वटरवरून शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

राहुल गांधी, मनमोहन सिंग यांना दु:ख
काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांच्या निधनाची बातमी ऐकून प्रचंड दुःख झाले. त्या काँग्रेस कन्या होत्या. त्यांचे कुटुंबीय आणि दिल्लीच्या नागरिकांप्रति मी संवेदना व्यक्त करतो, अशा शब्दांत राहुल गांधी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशाने एक समर्पित काँग्रेस नेतृत्व गमावले. अशा शोकभावना व्यक्त केल्या आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शीला दीक्षित यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्रीपद सर्वाधिक काळ भूषविण्याचा मान शीला दीक्षित यांच्याकडे जातो.
1998 पासून ते 2013 पर्यंत दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. 1984 ते 1989 या काळात त्यांनी उत्तर प्रदेशमधील कन्नौज लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्वही केले. केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती.
शीला दीक्षित यांची 2014 मध्ये केरळ राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती, मात्र त्यांनी 25 ऑगस्ट 2014 मध्ये राजीनामा दिला.

आपली प्रतिक्रिया द्या