
अनेक राज्यांमध्ये थंडीने नीचांक गाठलेला असतानाच राजधानी दिल्लीत पारा थेट 9.4 अंश सेल्सिअसवर आला. एवढे कमी तापमान दिल्लीत गेल्या 119 वर्षांमध्ये कधीच नोंदले गेले नव्हते. कारण सोमवारी तापमानाचा पारा दुपारी अडीच वाजल्यानंतर थेट 9.4 अंश सेल्सिअसवर गेला. हा दिवस सर्वाधिक थंड दिवस असल्याचे हवामान खात्याने (आयएमडी) सांगितले.
दिल्लीतील पालम आणि सफदरगंजमध्ये तापमानाचा पारा दुपारी अडीच वाजता 9.4 पर्यंत खाली आला होता. याच वेळी दिल्लीतील आर्यनगर येथे तापमान 7.8 अंश सेल्सिअसवर, रिड्जमध्ये 8.4 अंश सेल्सिअसवर, तर लोधी रोड येथे हेच तापमान 9.2 अंश सेल्सिअस नोंदण्यात आल्याचेही हवामान खात्याने या वेळी स्पष्ट केले. दिल्लीतील सफदरगंज येथे 1901 या वर्षानंतर या वर्षी डिसेंबरमध्ये तापमान एवढय़ा खाली आले आहे. यापूर्वी 28 डिसेंबर 1997 रोजी दिल्लीत 11.3 अंश सेल्सिअस एवढय़ा ऐतिहासिक तापमानाची नोंद झाली होती.
धुक्यामुळे थंडी वाढली
दाट धुक्यामुळे दिल्लीत थंडी मोठय़ा प्रमाणावर वाढत असल्याचे हवामान खात्याने सोमवारी सांगितले. पुढील आणखी किमान सात दिवस ही थंडी कमी होणार नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे. दिल्ली एनसीआरमध्ये दाट धुक्याचे साम्राज्यही मोठे पसरले आहे. या धुक्यामुळेच सूर्याची किरणे जमिनीवर येऊ शकत नाहीत. त्यामुळे थंडी कमी होण्याची सध्या तरी चिन्हे नाहीत, असे आयएमडीने म्हटले आहे. 5 जानेवारीपर्यंत पहाडी राज्यांमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी होणार आहे. यामुळे दिल्लीत थंडी आणखी वाढणार आहे हेही नक्की.
हँगिंग ‘आइस वॉल’
कश्मीर खोऱयातील तापमान गोठण बिंदूच्याही खाली गेले आहे. त्याचाच परिणाम म्हणून श्रीनगरच्या एका पुलावरून वाहणारे पाणी कोसळता कोसळताच चक्क बर्फात रुपांतरीत झाले आहे. बर्फाची हँगिंग ‘आईस वॉल’ पुलावरून जाणाऱया नागरीकांसाठी औत्सुक्याचा विषय ठरला आहे.



























































