दिल्लीत पुन्हा ‘गोली मारो’चे नारे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भयंकर हिंसाचाराने होरपळलेली देशाची राजधानी दिल्ली हळूहळू पूर्वपदावर येत आहे. तणाव काहीसा कमी होत असताना आज भाजप नेते कपिल मिश्रा यांच्या उपस्थितीत निघालेल्या ‘शांती मार्च’मध्ये पुन्हा ‘गोली मारो’चे नारे देण्यात आले. तसेच मेट्रोमध्येही नारेबाजी करण्यात आली. याप्रकरणी सहा जणांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, दिल्लीमध्ये तणाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

23 फेब्रुवारीपासून दिल्लीत तणाव वाढला आणि पुढील तीन दिवसांत भयंकर हिंसाचार उसळला. नागरिकत्व सुधारित कायदा (सीएए) समर्थक आणि विरोधक आमने-सामने आले. 42 जणांचा मृत्यू झाला तर शेकडो घरे-दुकाने जळून खाक झाली. या हिंसाचारमागे काही नेत्यांची चिथावणीखोर भाषणे कारणीभूत असल्याचा आरोप आहे. दिल्ली हायकोर्टाने भाजप नेते कपिल मिश्रा यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. आज दिल्लीत ‘शांती मार्च’ काढला, मात्र त्यातही काही जणांनी ‘देश के गद्दारोंको गोली मारो’ अशी नारेबाजी केली. त्यामुळे दिल्लीत पुन्हा तणाव वाढण्याची भीती आहे.

जंतरमंतर ते संसद मार्ग पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा
दिल्लीतील पिस फोरमने जंतरमंतर ते संसद मार्ग पोलीस ठाण्यापर्यंत ‘शांती मार्च’चे आयोजन केले होते. जिहादी दहशतवादाविरुद्ध हा मार्च असल्याचे सांगण्यात आले. हातात तिरंगा घेऊन मोठय़ा संख्येने लोक या शांती मार्चमध्ये सहभागी झाले होते. यावेळी ‘भारतमाता की जय’, ‘जय श्रीराम’ असे नारे देण्यात येत होते. काही जणांनी ‘देश के गद्दारोंको गोली मारो’ अशीही नारेबाजी केली. या शांती मार्चच्या अग्रभागी भाजप नेते कपिल मिश्रा होते. त्यांनी कोणतीही नारेबाजी केली नाही किंवा भाषण केले नाही. ‘शांती मार्च’च्या संयोजकांनी दिल्ली हिंसाचारात मृत्युमुखी पडलेले हेडकॉन्स्टेबल रतनलाल आणि आयबी अधिकारी अंकित शर्मा यांना श्रद्धांजली वाहिली.

मेट्रोमध्ये नारेबाजी
‘सीएए’ समर्थकांनी दिल्ली मेट्रोमध्ये आणि राजीव गांधी मेट्रो स्टेशनवर ‘गोली मारो’ अशी नारेबाजी केली. सीएए समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे काही काळ मेट्रो स्टेशनवर तणाव निर्माण झाला. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांनी तत्काळ नारेबाजी करणाऱया सहा जणांना ताब्यात घेतले आहे.