
सोशल मीडियावर सेन्सॉरशिप लादण्याबाबत कोणती मार्गदर्शक तत्त्वे असावीत ते सुचवा; मात्र ती देशाच्या राज्यघटनेतील कलमांचा भंग करणारी नसावीत, असे आवाहन दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि ट्विटर या संकेतस्थळाच्या संचालकांना केले आहे.
ट्विटरवरील मार्क्सिस्ट लेनिनिस्ट पक्ष सदस्या कविता कृष्णन यांनी पोस्ट केलेली ‘उनको फांसी दो’ या कवितेची पोस्ट वेगळेच चित्र टाकून दोनदा ट्विट केली म्हणून ट्विटरने ज्येष्ठ वकील संजय हेगडे यांचे अकाऊंटच निलंबित केले. या कृतीला आक्षेप घेत थेट दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. ऍडव्होकेट अगरवाल यांची याचिका दाखल करून घेत न्यायमूर्ती नवीन चावला यांनी सोशल साइटस्वरील सेन्सॉरशिपसाठी कोणते कायदेशीर निकष असावेत याबाबत केंद्र सरकार आणि ट्विटरचे मत मागवले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी आता येत्या 11 जानेवारीला होणार आहे. हे निर्देश देताना न्यायालयाने ऍड. हेगडे यांचे अकाऊंट तूर्तास पुन्हा सुरू करा, असे निर्देशही ट्विटरला दिले आहेत.
काय आहे हे प्रकरण…
मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट पक्षाच्या सदस्या आणि ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह वुमेन्स असोसिएशनच्या सचिव कविता कृष्णन यांनी ट्विटर हॅण्डलवर गोरख पांडे यांची ‘उनको फांसी दे दो’ ही कविता पोस्ट केली होती. नवी दिल्ली उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील ऍड. हेगडे यांनी तीच कविता शेअर करीत ‘हँग हिम’ हे इंग्रजी शीर्षक देत पुन्हा रिट्विट केली. सोबत त्यांनी 13 जून 1936 चा जर्मनीतील हॅम्बुर्ग शहरातील ब्लोहम व्होस शिपयार्डच्या कामगारांच्या मेळाव्यातील ‘नाझी सॅल्यूट’ देणारे छायाचित्रही टाकले. त्यात सर्व सॅल्यूट ठोकत असताना नाझीविरोधक ऑगस्ट लॅण्डमेसर हे मात्र हाताची घडी घालून उभे असलेले दिसतात. या पोस्टला आक्षेप घेत ट्विटरने 4 नोव्हेंबर 2029 ला हेगडे यांचे ट्विटर अकाऊंट निलंबित केले होते. मूळ पोस्टधारकावर कारवाई नाही आणि मी तीच पोस्ट पुन्हा रिट्विट केली म्हणून माझ्यावर कारवाई हा कुठला न्याय, असा सवाल करीत ऍड. हेगडे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात ट्विटरविरुद्ध याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणीचा निर्णय घेत न्यायालयाने ऍड. हेगडे यांना दिलासा दिला आहे.


























































