18 हजार कोटींची हमी द्या, मगच परदेशात जा! नरेश गोयल यांना दिल्ली हायकोर्टाची तंबी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

कर्जात बुडालेल्या जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना परदेशात जाण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने तूर्त बंदी घातली आहे. आधी 18 हजार कोटींच्या कर्जाची हमी द्या, मगच परदेशात जाण्यासाठी परवानगी मागा, अशी तंबी न्यायालयाने मंगळवारी गोयल यांना दिली.

गोयल यांनी ‘लूक आऊट सर्क्युलर’ला आव्हान देत याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती सुरेश कैत यांनी केंद्र सरकारला पुढील चार आठवडय़ांत उत्तर सादर करण्यास सांगितले, मात्र गोयल यांना परदेशात जाण्यासाठी परवानगी नाकारली. 18 हजार कोटींची बँक हमी द्यायला तयार असाल तर परदेशात खुशाल जा, असे न्यायमूर्तींनी गोयल यांना सुनावले. जेट एअरवेजने विविध कंपन्यांचे तब्बल 18 हजार कोटी रुपये थकवले आहेत. हा एक गंभीर घोटाळा असून त्याचा ‘एसएफआयओ’कडून तपास सुरू आहे, असे केंद्र सरकारतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. याप्रकरणी आता 23 ऑगस्टला सुनावणी होणार आहे.