
उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच इंजिनला आग लागल्याने एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. दिल्लीहून इंदूरला जाणाऱ्या विमानात रविवारी ही घटना घडली. प्रवाशांसाठी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच विमान चौकशीसाठी ग्राऊंड करण्यात आले आहे, असे एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
एअर इंडियाचे विमान AI2913 ने रविवारी नियमित वेळेनुसार दिल्ली विमानतळावरून इंदूरसाठी उड्डाण घेतले. मात्र काही वेळातच उजव्या बाजूच्या इंजिनमध्ये आग लागल्याचे संकेत कॉकपिट क्रूला मिळाले. मानक प्रक्रियेनुसार कॉकपिट क्रूने तात्काळ इंजिन बंद केले. यानंतर विमान पुन्हा दिल्ली विमानतळावर सुरक्षित उतरवण्यात आले.