
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
अमेरिका- चीनमध्ये सुरू असलेले व्यापार युद्ध, सिंगापूर, चीन, दक्षिण कोरिया आणि युरोपातील अनेक देशांचा खाली गेलेला विकासदर (जीडीपी), हिंदुस्थानात वाहन उद्योगात आलेली मंदी या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जगावर पुन्हा आर्थिक मंदीचे ढग जमा होऊ लागले आहेत, अशी भीती व्यक्त होत आहे. याचा फटका अनेक देशांना बसू शकतो. बेरोजगारीमध्ये वाढ होण्याची भीती आहे.
अमेरिका आणि इराणमधील तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.
‘ब्लुमबर्ग’ वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. तसेच बँक ऑफ अमेरिकेनेही आर्थिक मंदीच्या सावटामुळे जागतिक जीडीपी सुमारे 3.3 टक्क्यांपर्यंत खाली येईल अशी भीती व्यक्त केली आहे. अमेरिकेतील मल्टिनॅशनल इन्व्हेस्टमेंट बँक मॉर्गन स्टेलीने तर जागतिक जीडीपी 2019 मध्ये 3 टक्के आणि 2020 मध्ये 3.2 टक्के असेल असे भाकीत केले आहे.
काय आहेत कारणे
अमेरिका-चीनमध्ये गेल्या काही महिन्यांपासून व्यापारयुद्ध सुरु आहे. याचा फटका चीनबरोबरच संपूर्ण आशियाला बसला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत चीनच्या आयातीमध्ये 1.3 टक्क्यांनी घट झाली. निर्यातही 7.3 टक्क्यांनी घटली आहे. चीनचा जीडीपी 6.6 टक्क्यांवर आला आहे.
या व्यापार युद्धाचा फटका अमेरिकेलाही बसत आहे. 2018 मध्ये बेरोजगारीचा दर 3.9 टक्के होता. यात वाढ होण्याची शक्यता आहे.
अमेरिकेचे हिंदुस्थानबरोबरही व्यापार युद्ध सुरु आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानला दिलेला जर्नलाईज्ड सिस्टीम ऑफ प्रेफरन्सेसचा (जीएसपी) दर्जा काढला आहे. यामुळे हिंदुस्थानातून पूर्वी अमेरिकेत आयात केल्या जाणाऱया 3000 वस्तूंवर कोणताही कर नव्हता. आता कर लावला जात आहे.
हिंदुस्थानात ऑटोमोबाईल क्षेत्रात सलग तिसऱया महिन्यात वाहनांच्या विक्रीत घट झाली आहे. एप्रिल ते जून 2019 या तिमाहीत वाहन विक्री 12.35 टक्क्यांनी घसरली.
कार आणि व्यावसायिक वाहनांचे उत्पादनच कमी केले आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर नोकरी कपातीचे संकट वाहन उद्योगात येईल असे सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चर्सचे (एसआयएएम) अध्यक्ष राजन वाढेरा यांनी सांगितले.
गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी आतापर्यंत खरिपाचा पेरा 25 ते 30 टक्क्यांनी कमी झाला आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर शेती उत्पादन घटू शकते. पर्यायाने देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची भीती आहे.

























































