दिल्लीत खळबळ! जंतर- मंतरवर आंदोलकाने स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवलं; पोलिसांकडून तपास सुरू

राजधानी दिल्लीत एक धक्कादायक घटना घडली. दिल्लीच्या जंतर मंतरवर सोमवारी सकाळी 9 च्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने स्वत:लाच गोळी मारून आपले जीवन संपवले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्यक्ती एक आंदोलक असून तो येताना सोबत पिस्तूल घेऊन आला होता. हा व्यक्ती जंतर-मंतरवर आंदोलन करण्यासाठी आला होता. यासंदर्भात त्याने पोलिसांची परवानगी देखील घेतल्याचे पोलिसांनीच सांगितले आहे. दिल्ली पोलिसांनी उभारलेल्या मेटल डिटेक्टर गेटजवळील चहाच्या टपरीजवळ आंदोलकाने स्वतःवर गोळी झाडून घेतली.

घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलीस घटनास्थळी पोहोचले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. तसेच त्या व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.