
जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) आंदोलनावरून शुक्रवारी राज्यसभेत जोरदार खडाजंगी झाली. माकपाने विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईवर आक्षेप घेतला, तर भाजपने आंदोलन करण्यामागील विद्यार्थ्यांच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केला.
शून्य प्रहरमध्ये माकपाचे सदस्य के. के. रागेश यांनी जेएनयूच्या हॉस्टेलची फीवाढ आणि तेथील ड्रेसकोड, कर्फ्यूसंबंधित नियमावलीचा मुद्दा मांडला. फीवाढीचा पुनर्विचार व्हावा तसेच आंदोलन दडपण्यासाठी विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली. त्यांच्या मागणीला विरोधी पक्षांतील इतर सदस्यांनी पाठिंबा दिला. त्यावर भाजपचे प्रभात झा यांनी आक्षेप नोंदवला. जेएनयूला गौरवशाली इतिहास आहे, परंतु गेल्या काही वर्षांत जेएनयूमध्ये विद्यार्थी आंदोलनाच्या आडून देशविरोधी कारवायांना प्रोत्साहन दिले जात आहे. याची चौकशी झाली पाहिजे, असे म्हणणे झा यांनी मांडले. त्यावर राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनी केवळ जेएनयूतील फीवाढ व विवेकानंदांच्या पुतळ्याची विटंबना याविषयीचेच म्हणणे आता विचारात घेतले जाईल असे स्पष्ट केले. राज्यसभेतील या गोंधळामुळे जेएनयूतील फीवाढीचा गुंता लवकर सुटण्याची चिन्हे नसल्याचे चित्र आहे.
हार्दिक पटेल यांचा जेएनयूच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा
गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे शुक्रवारी जाहीर केले. विद्यापीठाच्या हॉस्टेलच्या फीवाढीच्या विरोधात या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. ट्विटरवरील आपल्या पोस्टमध्ये हार्दिक पटेल म्हणतात, हे विद्यार्थी स्वतःसाठी नव्हे, तर पुढच्या पिढीतील विद्यार्थ्यांसाठी झटत आहेत. धर्माच्या आणि राष्ट्रीयतेच्या नावावर आजच्या तरुणांची दिशाभूल केली जात असल्याचेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट केले.






















































