
नवी दिल्लीत जेएनयूमध्ये 5 जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी पुन्हा एकदा विद्यार्थी ,शिक्षकांसह राजकारणी मंडळी रस्त्यावर उतरली आहेत. गुरुवारी सकाळीच मंडी हाऊसजवळ विद्यार्थी व शिक्षकांनी मोर्चास सुरुवात केली. यावेळी पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये शाब्दीक चकमकही उडाली. पण पोलिसांनी वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवत विद्यार्थ्यांना मंडी हाऊस परिसरात 144 कलम लागू करण्यात आल्याचे लक्षात आणून दिले.
मंडी हाऊस ते एचआरडी मंत्रालय पर्यंत हा निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. शेकडो विद्यार्थी यात सहभागी झाले असून मंडी हाऊसपर्यंत पायी चालत जाण्याचा त्यांचा आग्रह होता. मात्र पोलिसांनी विदर्थ्यांना पायी न जाता बसमधून जाण्याच्या सूचना केल्या. यामुळे शेकडो विद्यार्थी बसमधून मंडी हाऊसकडे रवाना झाले. तेथे माकपचे नेते वृंदा करात आणि सीताराम येचुरी व इतर नेतेही पोहचले आहेत.
या निषेध मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण दिल्लीत कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आला असून कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून विशेष खबरदारी घेण्यास पोलिसांना सांगण्यात आले आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी जेएनयूचे कुलगुरु एम जगदीशन कुमार यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर जेएनयूमध्ये घुसून विदयार्थ्यांना मारहाण करणाऱ्या गुंडाना पोलिसांची साथ होती असा आरोपही विद्यार्थ्यांनी केला आहे.

























































