
दिल्ली विधानसभेची निवडणूक जाहीर झाली असून त्यामध्ये पुन्हा केजरीवाल सरकारच सत्तेवर येईल असा अंदाज एबीपी न्यूज-सी वोटरने व्यक्त केला आहे. त्यामुळे दिल्ली हस्तगत करण्यासाठी धडपडणाऱया भाजपला महाराष्ट्र आणि झारखंडनंतर तिसरा धक्का दिल्लीत बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री आरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टीने 2015 मध्ये 70 पैकी 67 जागा जिंकत मोठा विजय मिळवला होता. मात्र 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने दमदार कामगिरी करत सर्वच सात जागा जिंकल्या होत्या. त्याची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत घडेल असा अंदाज भाजपचे चाणाक्य व्यक्त करत आहेत. पण एबीपी न्यूज-सी वोटरने केलेल्या सर्वेक्षणातून भाजपला धक्का बसणार असल्याचे समोर आले आहे. आम आदमी पार्टीला सर्वाधिक 59 जागा मिळतील असे म्हटले आहे. तर दिल्लीत कमबॅकचा विश्वास बाळगलेल्या भाजपला केवळ आठ जागांवर समाधान मानावे लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
‘आप’ला 53 टक्के मते मिळणार
दिल्ली विधानसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत ‘आप’ला सर्वाधिक 53. 3 टक्के एवढय़ा मोठय़ा प्रमाणात मते मिळतील असा अंदाज आहे. तर लोकसभा निवडणुकीत दिल्लीत 57 टक्के मते मिळवत उत्कृष्ट कामगिरी करणाऱया भाजपला केवळ 25.9 टक्के मते मिळणार असून काँग्रेसला 4.7 टक्के मतांवर समाधान मानावे लागेल, असे एबीपी न्यूज सी वोटरने म्हटले आहे. दरम्यान, 2015च्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’ला 54 टक्के, भाजपला 32 टक्के तर काँग्रेसला 10 टक्के मते मिळाली होती.
70 टक्के नागरिकांची केजरीवालांना पसंती
एबीपी न्यूज सी वोटरने केलेल्या सर्वेक्षणामध्ये सहभाग घेतलेल्या 70 टक्के नागरिकांनी दिल्लीचा मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांना पसंती दिली आहे. तर केवळ 11 टक्के लोकांनी भाजप नेते हर्षवर्धन यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे. सात टक्के लोकांनी काँग्रेसचे नेते अजय माकन यांना, तर एक टक्का लोकांनी दिल्लीचे भाजप अध्यक्ष मनोज तिवारी यांनी पसंती दिली आहे.



























































