
मतचोरीच्या विरोधात इंडिया आघाडीने आज राजधानी दिल्लीत दणदणीत मोर्चा काढून निवडणूक आयोगाला दणका दिला. तब्बल 300 खासदारांच्या या मोर्चाने दिल्ली दणाणून गेली. सरकारने दडपशाही करून हे आंदोलन उधळण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी, प्रियंका गांधी, संजय राऊत, अखिलेश यादव आणि शरद पवार यांच्यासह अनेक खासदारांना अटक झाली, पण मोर्चेकरी खासदार हटले नाहीत. मोर्चाच्या मार्गावर ठिय्या देत त्यांनी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली आणि ‘एक व्यक्ती, एक मत’ हा नारा बुलंद केला. मतदार यादीची साफसफाई करा, दुबार व बोगस मतदार वगळा, अशा मागण्याही यावेळी करण्यात आला
राहुल गांधी यांनी मतचोरीचा पर्दाफाश केल्यानंतरही ढिम्म असलेल्या निवडणूक आयोगाला जाब विचारण्यासाठी व मतदार यादीच्या स्वच्छतेच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. संसद भवन ते निर्वाचन भवन असा हा मोर्चा होता. सकाळी 11 वाजता निघालेल्या या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. बॅरिकेड लावून मध्येच मोर्चा अडवला. अनेक खासदारांना ताब्यात घेण्यात आले. पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. निवडणूक आयोगानेही 300 खासदारांच्या भेटीस नकार दिला. तरीही खासदार हटले नाहीत. खासदारांनी मोर्चाच्या मार्गावरच ठिय्या दिला व घोषणाबाजी केली. खासदारांच्या हातात मागण्यांचे फलक होते. मतदार यादी स्वच्छ झालीच पाहिजे अशा घोषणा खासदारांनी दिल्या.
पोलिसांनी सर्व खासदारांना व्हॅनमध्ये बसवले. त्यावेळी गर्दीमुळे तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांना भोवळ आली. राहुल गांधी व संजय राऊत यांनी त्यांना सावरले व पाणी दिले.
‘डिनर पे चर्चा’
इंडिया आघाडीच्या खासदारांसाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज स्नेहभोजन ठेवले होते. मतचोरीच्या मुद्दय़ावरून निवडणूक आयोग व सरकारला घाम फोडणारे सर्व खासदार यावेळी उपस्थित होते. खासदारांमध्ये यावेळी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा व विचारांची देवाणघेवाण झाली. इंडिया आघाडीची एकजूट भक्कम असल्याचे यातून दिसून आले.
इंडिया आघाडीच्या मोर्चात 300 खासदार सहभागी झाले होते. घोषणाबाजी करत पुढे चाललेल्या खासदारांना पोलिसांनी अडवले व ताब्यात घेणे सुरू झाले. तरीही घोषणाबाजी सुरू होती. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी संविधान झळकावत ‘मोदी-शहा कायर है… वोट चोर गद्दी छोड’ अशा घोषणा दिल्या. मोर्चा सुरू असताना तृणमूलच्या खासदार मिताली बाग या बेशुद्ध झाल्या. हे कळताच राहुल गांधी बसमधून उतरले आणि त्यांची विचारपूस करून बाग यांना उपचारासाठी पाठवले.