
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवणारे नरेंद्र मोदी हे येत्या गुरुवारी दुसऱयांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत. या शपथविधी सोहळ्याला हिंदुस्थानच्या शेजारील पाकिस्तानला सोडून सर्व राष्ट्रांना आमंत्रण देण्यात आले आहे. पण त्यामुळे पाकिस्तानचा चांगलाच तीळपापड झाला असून हिंदुस्थानातील अंतर्गत राजकारणाच्या पार्श्वभूमीवर आम्हाला या सोहळ्याला निमंत्रण देण्यात आलेले नाही. ही हिंदुस्थानची मजबुरी असल्याचा कांगावा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे. शपथविधी सोहळ्याला जाणे महत्त्वाचे नाही तर कश्मीरचा मुद्दा सोडवणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सर्जिकल स्ट्राइकच्या मुद्दय़ावर मिळवले यश – शाह महमूद कुरेशी
पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये हवाई हल्ले करण्याच्या मुद्दय़ावर नरेंद्र मोदींनी हे प्रचंड यश मिळवले आणि आता पाकिस्तानला सोहळ्यासाठी निमंत्रण दिले तर विरोधी पक्ष त्यांच्यावर तुटून पडेल या भीतीनेच त्यांनी पाकिस्तानला निमंत्रण पाठवले नसल्याचे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी म्हटले आहे. एका खासगी वृत्तवाहिनीकडे त्यांनी आपले मत व्यक्त केले.

























































