
सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली
बटाटय़ावरून शेतकऱयांना कोर्टात खेचणाऱया पेप्सिको या अमेरिकन कंपनीने शुक्रवारी खटल्यात बिनशर्त माघार घेतली आहे. त्यामुळे बनासकांठा, साबरकांठा आणि अरवली जिल्हय़ातील शेतकऱयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पेप्सिकोने बटाटय़ाच्या एका विशिष्ट जातीच्या पेटंटच्या उल्लंघनाचा आरोप करत गुजरातच्या 9 शेतकऱयांवर खटला दाखल केला होता. पेप्सिकोने लेज चिप्ससाठी ज्या एफसी-5 या प्रकारातील बटाटय़ाचे पेटंट घेतले होते, त्या प्रकारातील बटाटय़ाची बेकायदा लागवड करत असल्याचा आरोप शेतकऱयांवर केला होता. यानंतर देशभरातील लोकांनी या शेतकऱयांना पाठिंबा दिला. सोशल मीडियावर पेप्सिकोच्या या निर्णयावर सडकून टीका करण्यात येत होती. पेप्सिकोने प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हरायटी अँड फार्मर्स राईट्स (पीपीव्हीएफआर) या कायद्याचे उल्लंघन केल्याचा शेतकऱयांचा आरोप होता. राजकीय नेत्यांनीही हा मुद्दा उचलून धरल्यामुळे वातावरण बरेच तापले होते. त्यामुळे शुक्रवारी अखेर पेप्सिकोने हा खटला मागे घेतला.

























































