एक लॅपटॉप, बोगस सिमकार्ड्स अन् अख्ख्या देशाची झोप उडवणारे फोन कॉल्स; 1100 वेळा बॉम्बची धमकी देणारा पदवीधर बेरोजगार गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाची राजधानी दिल्लीसह देशभरातील महत्त्वाच्या संस्थांना गेल्या काही महिन्यांपासून बॉम्ब स्फोटाची धमकी देणारा मास्टरमाइंड अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. दिल्ली पोलिसांनी कर्नाटकच्या म्हैसूरमधून श्रीनिवास लुईस याला अटक केली असून त्याच्यावर तब्बल 1100 पेक्षा जास्त बनावट बॉम्ब कॉल्स आणि ईमेल पाठवल्याचा खळबळजनक आरोप आहे.

दिल्ली उच्च न्यायालय, नामांकित शाळा, मोठी रुग्णालये आणि सरकारी कार्यालयांना उडवून देण्याच्या धमक्यांमुळे सुरक्षा यंत्रणांची मोठी धावपळ होत होती. प्रत्येक धमकीनंतर तातडीने सर्च ऑपरेशन राबवावे लागत असल्याने पोलीस आणि प्रशासनाचे प्रचंड श्रम आणि पैसा वाया जात होता. या प्रकरणाचा तांत्रिक तपास करताना दिल्ली पोलिसांना तपासाची चक्रे म्हैसूरपर्यंत घेऊन गेली. म्हैसूरमधील व्ही. व्ही. पूरम पोलिसांच्या मदतीने दिल्ली पोलिसांनी वृंदावन लेआऊट येथील एका घरावर छापा टाकून श्रीनिवासला बेड्या ठोकल्या.

आरोपी श्रीनिवास हा पदव्युत्तर पदवीधर आहे. तो अविवाहित असून आपल्या आईसोबत भाड्याच्या घरात राहत होता. त्याची आई निवृत्त सरकारी कर्मचारी असून त्यांच्या पेन्शनवर घराचा खर्च चालतो. पोलिसांनी त्याच्याकडून एक लॅपटॉप आणि अनेक बोगस सिम कार्ड्स जप्त केली आहेत. याच उपकरणांच्या साहाय्याने तो बनावट ईमेल आयडी तयार करून धमक्या पाठवत असे.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर विनाकारण धमक्या देण्यामागे नेमका हेतू काय होता, याचे गूढ अद्याप कायम आहे. प्राथमिक चौकशीत आरोपीची मानसिक स्थिती अस्थिर असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तो सध्या बेरोजगार असून एकाकीपणामुळे किंवा मानसिक अस्वस्थतेतून त्याने हे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. जप्त केलेल्या उपकरणांची आता फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे.

दरम्यान, आरोपीला ट्रान्झिट रिमांडवर दिल्लीत आणले जात आहे. त्याने केवळ दिल्लीतच नाही तर देशातील इतर कोणत्या शहरांमध्ये अशा धमक्या दिल्या आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत. या अटकेमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून दहशतीखाली असलेल्या यंत्रणांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.