यष्टिरक्षक रिद्धिमान साहाचे कसोटी संघात पुनरागमन, पंतला डच्चू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंध्रच्या विशाखापट्टणम शहरात बुधवारपासून यजमान हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका संघांतील पहिल्या कसोटी क्रिकेट लढतीला प्रारंभ होणार आहे. गेले काही महिने सतत फलंदाजीत अपयशी ठरणारा युवा यष्टिरक्षक रिषभ पंतला पहिल्या कसोटीसाठीच्या संघातून डच्चू देण्यात आला आहे. हिंदुस्थानी संघ पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध तीन कसोटी लढतींची मालिका खेळणार आहे. मालिकेतील पहिल्या कसोटीसाठीच्या संघात सलामीवीर रोहित शर्मा, यष्टिरक्षक-फलंदाज रिद्धिमान साहा आणि ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन यांनी पुनरागमन केले आहे.

पंतचा फ्लॉप शो; वेस्ट इंडीजविरुद्ध तीन डावांत फक्त 58 धावा
युवा यष्टिरक्षक रिषभ पंतला वेस्ट इंडीजविरुद्धच्या तीन कसोटी लढतींच्या मालिकेतही टीम इंडियात स्थान मिळाले होते; पण बेजबाबदार खेळ करीत त्याने चांगली संधी गमावली. या मालिकेत त्याने तीन डावांत केवळ 58 धावा नोंदवल्या. त्याआधी इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या ओव्हल कसोटीत नोंदवलेली शतकी खेळी हीच पंतसाठी जमेची बाजू म्हणावी लागेल. पण नंतरच्या मालिकांत मात्र त्याचा फ्लॉप शो कायम राहिल्याने त्याला संघाबाहेर जावे लागले आहे. विंडीजविरुद्धच्या मालिकेप्रसंगी सहाला राखीव खेळाडू म्हणून बेंचवर बसावे लागले होते.

अश्विन, रोहित 10 महिन्यांनंतर खेळणार कसोटी
टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा आणि अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन यांना तब्बल दहा महिन्यांनंतर कसोटी लढतीत खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्या कामगिरीकडे हिंदुस्थानी क्रिकेट शौकिनांचे लक्ष लागले आहे. दोघांनीही ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध आपली अखेरची कसोटी लढत खेळली होती.

पहिल्या कसोटीसाठी हिंदुस्थानी संघ – विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा बिहारी, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, रिद्धिमान साहा (यष्टिरक्षक), इशांत शर्मा, मोहम्मद शमी.

टीम इंडियाला आगळय़ा विक्रमाची संधी
वेस्ट इंडीजविरुद्ध मिळवलेला विजय हा हिंदुस्थानचा मायदेशातील सलग दहावा कसोटी मालिका विजय होता. त्यामुळे बुधवारपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू होणाऱया कसोटी मालिकेत जर टीम इंडियाने विजय मिळवला, तर हा हिंदुस्थानचा मायदेशातील सलग 11 वा कसोटी मालिका विजय असेल. या आधी कोणत्याही संघाला मायदेशात सलग 10 पेक्षा अधिक कसोटी मालिका विजय मिळवता आलेले नाही. त्यामुळे हिंदुस्थानला मायदेशात सलग 11 कसोटी मालिका विजय मिळवून नवा पराक्रम करण्याची संधी आहे. मायदेशात सर्वाधिक सलग कसोटी मालिका विजय मिळवण्याचा विक्रम हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया या संघांच्या नावावर आहे. दोन्ही संघांनी 10 मालिका विजय मिळवले आहेत. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाने दोन वेळा मायदेशात सलग
10 कसोटी मालिका विजय मिळवले आहेत, पण त्यांना 11 वा विजय मिळवता आलेला नाही. तो विक्रम यंदाची मायदेशातील मालिका जिंकून हिंदुस्थानी संघ साकारू शकतो.