
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
दहशतवादी व कट्टर पंथियांच्या मदतीने शेकडो रोहींग्यांनी दक्षिणेकडील राज्यांकडे आपला मोर्चा वळवला असून ही चिंतेची बाब आहे. अशी खळबळजनक माहिती हिंदुस्थानच्या गुप्तचर यंत्रणेने दिली आहे. दिल्लीहून दक्षिेणेकडे जाणाऱ्या नॉर्थ ईस्ट एक्सप्रेस आणि डिब्रूगडपासून कन्याकुमारीला जाणाऱ्या चौदा गाड्यांमधून हे रोहींगे केरळ आणि हैदराबादला पळाले आहेत. गुप्तचर यंत्रणांनी याबद्दल गृह मंत्रालयाला अहवालही पाठवला आहे.
‘द प्रिंट’ ने याबदद्ल वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार २६ सप्टेंबरला रेल्वे पोलिसांनीदेखील रोहींगे दक्षिणेकडे पळाल्याचे गृह मंत्रालयाला सूचित केले होते. त्यानंतर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केरळ सरकारला अलर्ट राहण्याचे निर्देश दिले आहेत. ‘हरकत उल जिहाद अल इस्लामी’ या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी या रोहींग्यांबरोबर असून ते रोहींग्याचा वापर देशभरात दहशतवादी हल्ले घडवण्यासाठी करू शकतात. असे आयबीचे म्हणणे आहे. हरकत उल जिहाद अल इस्लामी ही दहशतवादी संघटना पाकिस्तान व बांग्लादेशमध्ये सक्रिय असून हिंदुस्थानमध्येही हातपाय पसरवण्याच्या तयारीत आहे.

























































