
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. छोट्या पडद्यावरील अभिनेत्री मंत्री बनू शकते ,चहावाला कुठल्या कुठे जाऊ शकतो मग मी GSTवर का नाही बोलू शकत? असा सवाल त्यांनी केला आहे. एका हिंदी वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत सिन्हा यांनी स्वपक्षालाच घरचा आहेर दिला आहे.
एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीच्या ‘हमलोग’ या कार्यक्रमात बोलताना सिन्हा यांनी राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यावर कौतुकाचा वर्षावच केला. त्यांच्या व यादव कुटुंबीयांच्या जवळकीबद्दल बोलताना सिन्हा म्हणाले की यादव कुटुंबीयांशी जुने नाते आहे. ज्यावेळी माझ्या आईचे निधन झाले तेव्हा सगळ्यात आधी माझ्या घरी येणारे व शेवटी जाणारे यादव कुटुंबीय होते. त्यावेळी लालूजींच्या पत्नी मुख्यमंत्री होत्या. जर आज इंदीरा गांधी असत्या तर लालू कदाचित काँग्रेसमध्ये असते. याचबरोबर सिन्हा यांनी यावेळी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचही कौतुक केलं. तसेच हे माझ सौभाग्य आहे की सर्वच पक्षांचे माझ्यावर प्रेम आहे. मग ती ममता असो, काँग्रेस असो किंवा राजद. हे सगळेजण माझ्या सुखदु:खाचे भागीदार आहेत. असंही सिन्हा यांनी म्हटले आहे.
दरम्यान भाजपच्या कामगिरीवर प्रश्न विचारताच सिन्हा म्हणाले की पक्ष केव्हा काम करेल याची मी वाट पाहतो आहे. ज्यावेळी भाजपच्या फक्त दोन जागा होत्या तेव्हापासून मी या पक्षाबरोबर जोडला गेलो आहे. काहीही झाले तरी माझी जागा पाटणाच असणार आहे. जर छोट्या पडद्यावर काम करणारी अभिनेत्री मंत्री बनू शकते, चहावाला कुठल्या कुठे जाऊ शकतो. तर मग मी जीएसटीवर का नाही बोलू शकत असा सवालही सिन्हा यांनी यावेळी केला.

























































