
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
जर तुम्ही कुठे इंटरव्यूला जात असाल तर सगळ्यांशी अदबीने आणि नम्रतेने बोलणं तुमच्यासाठी उत्तम ठरेल. उगाचच छोट्या छोट्या कारणांवरून कुणावरही खेकसू नका. नाहीतर तुमच्यावर पश्चातापाची वेळ येईल. कारण एका तरुणाला ड्रायव्हरवर ओरडल्याने CEO पदाची गलेलठ्ठ पगाराची नोकरी गमवावी लागली आहे. ट्रॅफिकमध्ये अडकल्याने हा तरुण वैतागला होता. त्याने त्याचा राग ड्रायव्हरवर काढत आरडाओरड केली होती.
जो व्यक्ती इंटरव्हूयसाठी आलेला आहे तो आपल्यावर आपली चूक नसतानाही ओरडल्याचे ड्रायव्हरने कंपनीला सांगितले. जो व्यक्ती ट्रॅफीक सुरळीत होईपर्यंतचा ताण सहन करू शकत नाही ती कंपनीवर रोज येणारा ताण कसा हाताळू शकतो असा प्रश्न या कंपनीच्या व्यवस्थापनाला पडला. या कंपनीच्या व्यवस्थापनाने हा उमेदवार सीईओ या पदासाठी योग्य नसल्याचं म्हणत त्याला नोकरी देणार नाही असं स्पष्ट शब्दात सांगितलं.
संबंधित तरुणाला एका कंपनीत सीईओ या उच्चपदासाठी इंटरव्यूला बोलावण्यात आले होते. शिक्षण व कामाच्या अनुभवावरून नोकरी त्यालाच मिळण्याची शक्यता होती. यासाठी त्याच्या कंपनीने दोन वेळा मुलाखती घेतल्या होत्या. मुलाखतीची अंतिम फेरी होती आणि त्याच दिवशी त्याने आरडाओरड केली. यामुळे त्याला हमखास मिळणारी नोकरी त्याने गमावली.
तिसऱ्या मुलाखतीसाठी कंपनीने या तरुणाला गाडी पाठवली होती. तिसरा व शेवटचा इंटरव्यू असल्याने तरुणही खुश होता. पण रस्त्यात मध्येच वाहतूक कोंडी झाली, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या वाहतूककोंडीमुळे संतापलेल्या तरुणाने ड्रायव्हरला तासायला सुरूवात केली. ‘तुला गाडी नीट चालवत येत नाही’ असं म्हणत त्याने ड्रायव्हरवर सगळा राग काढला होता. हा राग या तरुणाला भारी पडला असून त्याच्या वाट्याला आलेली चांगली नोकरी त्याने गमावली आहे.



























































