
कॉलेजसाठी घराबाहेर पडली आणि मित्रांसोबत तिने दिल्लीहून थेट मुंबई गाठली. चित्रपटात पाहिलेली आणि अनेकांकडून ऐकलेली मुंबई ती ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्यास उत्सुक होती. पण दादर स्थानकात मित्रांसोबत चुकामूक झाली आणि ती रस्ता भरकटली. मित्रांना शोधत ती भारतमाता सिनेमागृहाजवळ पोहचली. तेथे रडत बसलेली असताना वाहतूक पोलिसांची तिच्यावर नजर पडली. त्यामुळे भोईवाडा पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन तिची सुखरूप घरवापसी केली.
आंचल (18) ही तरुणी कुटुंबीयांसह दिल्लीत राहते. बारावीत शिकणाऱया आंचलला मुंबईचे फार आकर्षण होते. त्यामुळे 7 तारखेला ती कॉलेजला जाण्यासाठी घराबाहेर पडली, पण घरी परतलीच नाही. तिने दोन मित्र व दोन मैत्रिणीसोबत थेट मुंबई गाठली. 8 तारखेला मुंबईत आल्यानंतर ते पाच जण दक्षिण मुंबईत फिरले आणि मिळेल तेथे आसरा घेतला. पण 10 तारखेला संध्याकाळी दादर स्थानकात आंचलची अन्य चौघांपासून ताटातूट झाली. सोबत मोबाईल नाही, शिवाय अन्य चौघांकडेही मोबाईल नसल्याने संपर्क साधायचा कोणाला? त्यांना शोधायचे कसे असा प्रश्न तिला पडला. चौघांना शोधण्यासाठी ती दादरहून लोअर परळला उरतली आणि चालत भारतमाता सिनेमागृहाजवळ आली. तेथेच ती रडत बसली. सुदैवाने तेथे तैनात असलेल्या वाहतूक पोलिसांच्या नजरेस पडली. त्यांनी विचारपूस करून भोईवाडा पोलिसांना कळवले. मग उपनिरीक्षक देवरे, सहाय्यक फौजदार राजेंद्र पाटील तसेच चव्हाण, तेजस्विनी कांबळे, गोरे या पथकाने मुलीला ताब्यात घेऊन तपास सुरू केला.
खोटे बोलली, पण सत्य समोर आले…
चौकशी केल्यावर दादर स्थानकात भाऊ व मैत्रिणीशी चुकामूक झाल्याचे ती म्हणाली. पण पोलिसांनी शिताफीने बोलते केल्यावर तिने चार मित्रांसोबत मुंबईत आल्याचे व त्यांच्यासोबत ताटातूट झाल्याचे म्हणाली. कांबळे यांनी तिची बॅग तपासली असता त्यात कॉलेजचे कपडे व आय कार्ड मिळाले. त्यावर मुलीच्या वडिलांचा मोबाईल नंबर होता. त्या क्रमांकावर संपर्क साधल्यावर ती त्यांचीच मुलगी असून ती दिल्लीतून बेपत्ता झाल्याने हरविल्याची तक्रार नोंदविल्याचे सांगितले. मग मुलीच्या मुंबईत राहणाऱ्या नातेवाईकांशी संपर्क साधून तिला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.