दिल्ली गोठली; 100 वर्षांचा रेकॉर्ड मोडला, 4.2 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर हिंदुस्थानात थंडीची अक्षरशः लाट आली असून दिल्ली तर गोठली आहे. दिल्लीतील थंडीने गेल्या 100 वर्षांचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. या ठिकाणी डिसेंबर महिन्यात अशा प्रकारे थंडीची लाट येण्याची ही दुसरी वेळ आहे. 1901 ते 2018 दरम्यान केवळ चार वेळ डिसेंबरमधील तापमान 20 डिग्रीच्याही खाली गेले आहे. यंदा 26 डिसेंबरपर्यंत तापमान 19.85 डिग्री होते. 31 डिसेंबरपर्यंत त्यात घट होऊन तापमान 19.15 डिग्रीपर्यंत जाईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, आज शुक्रवारी दिल्लीत किमान तापमान 4.2 डिग्री सेल्सियस इतके नोंदवले गेले.

नव्या वर्षात गारपिटीचा अंदाज

नव्या वर्षात देशाच्या अनेक भागांत गारपीट होऊ शकते असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे नववर्षाचे स्वागत करण्यासाठी घराबाहेर पडणाऱयांच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे. 1 आणि 2 जानेवारी 2020 यादरम्यान गारपीट होऊ शकते. 3 जानेवारी रोजी हिल स्टेशनच्या ठिकाणी जोरदार बर्फवृष्टी होईल असाही अंदाज आहे. दरम्यान, राजस्थानात रात्रीचे तापमान 0 ते 3 डिग्री सेल्सियसपर्यंत गेले आहे.

  • 1997 साली दिल्लीत डिसेंबर महिन्यातील तापमान 17. 3 डिग्री सेल्सियस इतके नोंदवले गेले.
  • यंदा 29 डिसेंबरपर्यंत दिल्ली, पंजाब, हरयाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
  • राजस्थानही गोठले असून रात्रीचे तापमान 0 ते 3 डिग्री सेल्सियस इतके नोंदवले गेल्याने दवबिंदू गोठल्याची परिस्थिती आहे.
  • दिल्लीची हवा अत्यंत खराब झाली असून एअर क्वॉलिटी इंडेक्स 349 इतका झाला आहे. सकाळी आणि सायंकाळी श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे चित्र आहे.
    महत्त्वाचे