गणेश भक्तांकडूनच यंदा ‘निसर्गपूरक’ साहित्याची मोठी मागणी

रश्मी पाटकर, मुंबई

महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पाचं आगमन आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. गणेशोत्सवानिमित्त मुंबईसह राज्यातील बहुतांश भागात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. बाप्पाची मूर्ती, त्याचं मखर, कंठी यांच्या खरेदीसाठी बाजार गजबजू लागले आहेत. आपल्या लाडक्या बाप्पासाठी ग्राहक मोकळ्या हाताने खरेदी करत आहेत. पण, दरवर्षी होणारं प्रदूषण लक्षात घेऊन यंदा गणेश भक्तांचा ओघ निसर्गपूरक गणेशोत्सवाकडे असल्याचं दिसून येत आहे.

दरवर्षी विसर्जनानंतर चौपाट्यांवर निर्माल्य, थर्माकोल आणि पाण्यात न विरघळलेल्या पीओपीच्या मूर्ती किनाऱ्यांवर आलेल्या दिसतात. या घातक घटकांना फाटा देत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गेला बराच काळ आवाहन करण्यात येत होतं. या आवाहनामुळे आता जनजागृती झाल्याचं दिसून येत आहे. मुंबईकरांनी जागरुकता दाखवत निसर्गपूरक साहित्याची मागणी करायला सुरुवात केला आहे. कोकण कला आणि शिक्षण संस्थेचे सहअध्यक्ष नवल शेवाळे हे गेल्या चार वर्षांपासून मुंबईत कागदाचा लगदा आणि शाडुच्या मातीपासून तयार झालेल्या गणेश मूर्ती विकत आहेत. कागदाचा लगदा आणि माती हे दोन्ही घटक पाण्यात विरघळणारे असतात आणि या जलरंगात (वॉटर कलर्स) मध्ये रंगवलेल्या असतात. दोन वर्षांपूर्वीपर्यंत जे भाविक पीओपीच्या मूर्ती विकत घेत होते, तेही आता इको फ्रेंडली मूर्तींकडे वळत आहेत. ग्राहकांच्या वाढत्या मागणीमुळे कोकण परिसरातील पीओपी गणेशमूर्ती तयार करणारे कारागिरही आता इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवण्यासाठी प्रेरित झाले आहेत. शाळांमधून केलेल्या जनजागृतीमुळे आता भाविकांची मुलंच इकोफ्रेंडली मूर्तींना प्राधान्य देत असल्याचं निरीक्षण शेवाळे यांनी नोंदवलं आहे.

बाप्पासाठीच्या मखरांमध्येही यंदा भक्तांनी थर्माकोलला पूर्ण फाटा द्यायचा निश्चय केल्याचं दिसत आहे. थर्माकोलची मखरं एखाद दुसऱ्या वेळीच वापरून मग फेकून दिली जातात. त्याने प्रदुषणात भर पडते. त्या ऐवजी आता बाजारात लाकडी प्लायपासून बनलेली आकर्षक रंगसंगतीची आणि किमान तीन ते चार वर्षं पुन्हा वापरता येतील अशी मजबूत मखरं उपलब्ध झाली आहेत. थर्माकोलच्या मखरांप्रमाणेच ती लहान मोठ्या आकारात उपलब्ध आहेत. त्यांच्या किमती थोड्या जास्त असल्या तरी गणेश भक्त प्लायच्या मखरांनाच पसंती देत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या