
सामना प्रतिनिधी । बीड
मराठवाड्याच्या घशाला कोरड पडली आहे. प्रकल्प कोरडे ठाक पडले आहेत. भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. परिस्थिती गंभीर आहे. यापेक्षा विदारक परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यासाठी आताच जाईकवाडी प्रकल्पात 10 टी एम सी पाणी सोडा, अशी आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे.
मराठवाड्याची तहान भागवणार्या जायकवाडी प्रकल्पात केवळ 36 टक्के पाणीसाठा शिल्लक असून चालू वर्षी मराठवाड्यात 49 टक्के पाऊस झाला आहे. जायकवाडी प्रकल्पात 65%पेक्षा पाणी कमी झाले तर नाशिक, नगर धरणातील पाणी सोडण्याची मेंढीगिरी समितीची शिफारस शासनाने स्वीकारली आहे. प्रत्येक वेळी कमिटीच्या बैठका झाल्या, निर्णय झाले, मात्र अद्यापही पाणी सोडण्यात आले नाही. समितीच्या सूचनांनुसार 10 टीएमसी पाणी सोडले तर केवळ 6 टीएमसी पाणी मिळू शकते. मराठवाड्याला पाणी सोडताना दरवेळीच अडवणूक होते. मराठवाड्यातील अनेक प्रकल्पांची पाणी पातळी शुन्य टक्के आहे. मराठवाड्यात भीषण दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणांमधून 10 टी.एम.सी.पाणी जायकवाडी प्रकल्पात सोडले तर संभाजीनगर, बीड जालना, परभणी, नांदेड अशा पाच मोठ्या शहरांना पाणी पुरवठा होऊ शकतो. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता मेंढीगिरी समितीच्या सूचनेनुसार वेळ काढू धोरण न करता व कुणाच्याही दबावाखाली न येता पाणी तात्काळ सोडण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
गेल्या काही वर्षांपासून मराठवाड्यावर पावसाअभावी पाणी टंचाईचे संकट ओढावले आहे. मराठवाड्याची तहान भागवणार्या जायकवाडी प्रकल्पाची पाणी पातळी केवळ 36 टक्के असून यंदा मराठवाड्यात सरासरी 49 टक्केच पाऊस पडला आहे. मराठवाड्यातील मोठ-मोठे प्रकल्प सध्या शुन्य पातळी पाणी साठ्यात असून त्यामुळे मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याचे संकट ओढावणार आहे. जायकवाडी प्रकल्पात 67 टक्के कायम पाणीसाठी राहिला पाहिजे असा अहवाल मेंढीगिरी समितीने दिला आहे. नाशिक आणि नगर भागात जवळपास सर्वच प्रकल्प भरलेले आहेत परंतु मराठवाड्यातील प्रकल्प कोरडे आहेत. मेंढीगिरी समितीच्या निर्णयानुसार नाशिक व नगरमधून 10 टी.एम.सी.पाणी सोडले तर भविष्यात पिण्याचे पाणी तरी मिळेल. संभाजीनगर, जालना, बीड, परभणी व नांदेड अशा मोठ्या शहरांना पिण्याचे पाणी मिळू शकते. उर्वरीत भागासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असून सातत्याने दुष्काळाचा सामना करणार्या मराठवाड्याकडे गांभिर्याने लक्ष द्यावे मराठवाड्यासाठी पाणी सोडताना अडवणुक व वेळ काढूपणा न करता तात्काळ पाणी सोडावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.































































