ट्रम्प यांना पदावरून हटवण्याची डेमोक्रॅट्सची मागणी; काही रिपब्लिकन नेतेही वैतागले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराणमधील ‘संपूर्ण संस्कृती’ नष्ट करण्याच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीचा डेमोक्रॅटिक नेत्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. त्यांनी ट्रम्प यांना ‘तात्काळ पदावरून हटवण्याची’ मागणी केली आहे, तर काही रिपब्लिकन नेत्यांनीही यावर नाराजी व्यक्त करत ही विधाने केवळ ‘पोकळ धमक्या’ असावीत अशी अपेक्षा आणि प्रार्थना व्यक्त केली आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प यांची विधाने ‘मानसीक संतूलन ढासळल्यासारखी ‘ आणि ‘युद्धगुन्ह्यांच्या’ श्रेणीत येणारी असल्याचे म्हणत डेमोक्रॅट्सनी अमेरिकन संविधानातील २५ व्या दुरुस्तीचा आधार घेऊन त्यांना पदावरून हटवण्याच्या मागणीचा जोर धरला आहे. अमेरिकेच्या माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी मंगळवारी रात्री पोस्ट केले होते की, ‘ट्रम्प यांचा बेजबाबदारपणा आपल्या धाडसी सैनिकांचे प्राण विनाकारण धोक्यात घालत आहे, अमेरिकेची जागतिक प्रतिमा डागाळत आहे आणि अमेरिकन लोकांसाठी जीवन जगणे अधिक महाग करत आहे. आपण सर्वांनी याच्या विरोधात उभे राहिले पाहिजे आणि स्वतःहून लादलेल्या या बेकायदेशीर युद्धाला निधी देण्यास विरोध केला पाहिजे’.

रिपब्लिकन सिनेटर रॉन जॉन्सन यांनी देखील ट्रम्प यांच्या विधाने आणि धमक्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. जॉन्सन यांनी सांगितले की, ते ट्रम्प यांच्या अशा धमक्यांचे समर्थन करत नाहीत आणि ट्रम्प यांची विधाने ही केवळ पोकळ धमक्या असाव्यात, अशी त्यांना आशा आहे.

दरम्यान, व्हाइट हाऊस परिसरात मोठ्या प्रमाणात आंदोलक जमले असून ते ट्रम्प यांना पदावरून हटवण्याची मागणी करत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केलेल्या युद्धविरामाच्या घोषणेवर, मॉर्गन टेलर नावाच्या एका आंदोलकाने म्हटले की, ‘जे काही सुरू आहे ते आम्हाला सहन होत नाहीये, म्हणूनच आज रात्री आम्ही येथे रस्त्यावर उतरलो आहोत. आम्ही निवडणुकीपर्यंत वाट पाहू शकत नाही… या देशात जे घडत आहे ते आता थांबायला हवे. केवळ या देशातच नाही, तर या देशाकडून जगभरात जो क्रूरपणा सुरू आहे, आणि या राष्ट्राध्यक्षाने व्हाईट हाऊसमधून जे युद्धगुन्हे केले आहेत—त्यामुळे या माणसाने आता पदावरून जायलाच हवे. ही संपूर्ण राजवटच संपुष्टात यायला हवी. जोपर्यंत ते जात नाहीत, तोपर्यंत आपल्याला दररोज हे रस्ते आंदोलकांनी भरून टाकावे लागतील… दररोज लोक मरत आहेत. त्यांच्यामुळे जगभरात दररोज अधिकाधिक लोक यातना सोसत आहेत…’