
परभणी शहरात गेल्या काही दिवसांपासून अज्ञात तापीच्या आजाराने अनेकजण रुग्णालयात दाखल झाले आहेत. जवळपास 70 जणांचे रक्ताचे नमुने तपासण्यात आले आहेत. डेंग्यू लागन झाली नसल्याचा दावा करणारे मनपा प्रशासन मात्र अद्यापही गाढ झोपेत असल्याचे समोर आले आहे. परभणी येथील मराठवाडा प्लॉट साई कॉर्नर येथे एक डेंग्यूचा रुग्ण आढळला असून शहरात धूर फवारणी करून डेंग्यूचा डासांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शहरातील नागरिकांमधून मागील अनेक दिवसांपासून होत आहे.
परभणी शहरातील मराठवाडा प्लॉट साई कॉर्नर येथे अभय विजय पानबुडे या सतरा वर्षीय मुलास सोमवारी रोजी ताप आल्यामुळे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र येथील डॉक्टरांनी दोन दिवस दाखल करत थातूर मातूर औषधोपचार केला. मात्र रक्त तपासणीसाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर रक्त तपासणीअंती अहवालामध्ये डेंग्यू सद्रश्य आजाराचे लक्षण आढळून आले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून मनपा प्रशासन मात्र अद्यापही प्रभावी उपाययोजना करत नसल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केल्या जात आहे. एकीकडे निवडणूकीची धामधूम तर दुसरेकडे दिवाळीचा सण तोंडावर अशा परिस्थितीत परभणी शहरात मोठ्या प्रमाणात डेंग्यू रुग्ण आढळल्याने घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्हा रुग्णालायासह खाजगी रुग्णालयातही तापीच्या आजाराने अनेकजण उपचार घेत आहेत. मनपा प्रशासनाने तातडीने धुर फवारणी करून उपाययोजना किमान करावी, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. परभणी शहरात बांधकाम न केलेले प्लॉट मोठ्या प्रमाणात असल्याने या ठिकाणी घाण पाणी साचून डासांची उत्पत्ती ही मोठ्या प्रमाणात होत आहे. याकडेही मनपा दुर्लक्ष करत आहे, असा सवाल केल्या जात आहे. शहरामध्ये महिन्यातील एकच वेळेस नळाला पाणी येत आहे. त्यामुळे नागरिक नळाला पाणी आल्यानंतर घरातील छोट्या मोठ्या भांड्यासह बॅरल पाण्याने भरून ठेवतात. बॅरलला झाकण लावत नसल्याने डेंग्यूचे मच्छर त्या पाण्यात अंडे घालत आहेत. हे डेंग्यूचे मच्छर नागरिकांना चावल्यामुळे डेंग्यूचे रुग्ण शहरात वाढत आहेत. मनपाने शहरामध्ये दोन दिवसांआड नळाला पाणीपुरवठा करावा. तसेच शहरात धुर फवारणी करून डेंग्यूचा डासांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शहरातील नागरिकांमधून मागील अनेक दिवसांपासून होत आहे. परंतु याकडे मनपाचे सर्रासपणे दुर्लक्ष होत आहे.

























































