महापूरानंतर आता साथीच्या आजारांचे संकट; खेडमध्ये डेंग्युचे रुग्ण वाढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापूराच्या संकटातून हळूहळू सावरत असताना खेडमध्ये साथीचे आजार वाढण्याचे संकट आहे. महापूरानंतर खेडमध्ये डेंग्युच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. महापुरामुळे शहरात साचलेले पाणी, गाळ,चिखल यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती झाली असून खेड शहर आणि आजुबाजुच्या परिसरात डेंग्युची साथ झपाट्याने पसरत आहे.

जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खेड शहराजवळून वाहणाऱ्या जगबुडी आणि नारिंगी या दोन्ही नद्यांना महापूर आला. पुराचे पाणी खेडच्या बाजारपेठेत आणि आजुबाजुच्या गावांमध्ये शिरले. तीन दिवसांनंतर महापूर ओसरला. मात्र पूर ओसरल्यावर पुरग्रस्त भागात चिखल, गाळ आणि पाण्याची डबकी तयार झाली. महापूरात दुकानात पाणी शिरल्याने दुकानातील अन्नधान्य व इतर सामान कुजून गेले. त्यामुळे साफसफाईला सुरुवात झाल्यावर शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली. शहरात सगळीकडे पसरलेला चिखल, निर्माण झालेली डबकी यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती झाली.

महापुरानंतर होणारी संभाव्य रोगराई टाळण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने तात्काळ साफसफाईचे काम हाती घेतले आहे. रोगराई पसरू नये यासाठी डास निर्मूलन मोहीम हाती घेण्याबरोबरच आरोग्य शिबीराचेही आयोजन केले आहे. मात्र, तरीही डेंग्यूने शहर व पसिरात मोठ्या प्रमाणात हातपाय पसरायला सुरवात केली आहे. गेले दीड वर्षे कोरोनाच्या महामारीचा सामना करता करता नागरिक त्रस्त झाले आहेत. कोरोनाने कित्येक संसार उद्धवस्त झाले आहेत. अनेकांच्या घरातील कर्ता पुरुष कोरोनाचा बळी ठरला आहे. तरअनेकांच्या नोकऱ्या गेल्याने आर्थिक संकट कोसळले आहे. या परिस्थितीचा सामना करत असतानाच महापुराचा फटका बसला.

महापुराच्या संकटातून सावरत असताना आता डेंग्युसारख्या साथरोगाचे संकट उभे ठाकले आहे. गेल्या चार दिवसात शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात डेंग्युसदृश्य आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णालयात येणाऱ्या दहा रुग्णांपैकी दोन रुग्ण कोरोनाचे तर 8 रुग्ण डेंग्यूचे असल्याचे निष्पन्न होत असल्याने झपाट्याने पसरणाऱ्या डेंग्युला आळा घालण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या खेड तालुक्यात 174 कोरोनाचे रुग्ण आहेत तर डेंग्युसदृश्य आजाराचे 22 रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्युची साथ रोखण्यासाठी आरोग्य विभागाने किटकनाशक फवारणी करण्यास सुरवात केली असून नागरिकांना डेंग्युपासून बचाव करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत जनजागृती केली जात आहे.