देवनार डंपिंग ग्राऊंडवर आणखी बाराशे मेट्रिक टन कचर्‍यापासून वीजनिर्मिती

पालिकेच्या देवनार डंपिंग ग्राऊंडवर पालिका आणखी बाराशे टन कचर्‍यापासून वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प लवकरच सुरू करणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी तंत्रज्ञान, सूचना आणि अद्ययावत टेक्नॉलॉजी सुचवण्यासाठी पालिकेने जागतिक स्तरावर निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, देवनार येथेच पालिकेच्या 600 मेट्रिक टनांवरील वीजप्रकल्पाची कार्यवाहीदेखील वेगात सुरू आहे. यामुळे मुंबईतील कचर्‍याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे.

मुंबईत दररोज 5900 मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. कचर्‍याचे प्रमाण करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे दररोजच्या 7 हजार मेट्रिक टन कचर्‍याचे हे प्रमाण आता कमी झाले आहे.

मुंबईच्या एकूण कचर्‍यातील 500 ते 600 मेट्रिक टन कचरा पालिकेच्या १2 हजार हेक्टर जागेवर विस्तारलेल्या देवनार डंपिंग ग्राऊंडवर टाकला जातो. 1923 पासून सुरू झालेल्या देवनार डंपिंग ग्राऊंडवर सद्यस्थितीत तब्बल 70 लाख मेट्रिक टन कचरा साचला आहे. त्यामुळे एकूणच मुंबईतील कचर्‍याचे प्रमाण कमी करण्यासाठी पालिका कचर्‍यापासून वीजनिर्मिती करण्याचे प्रकल्प राबवत आहे.

वाढीव वीज विक्रीतून उत्पन्नही मिळणार

प्रस्तावित बाराशे मेट्रिक टन कचर्‍यापासून दररोज 4 ते 6 मेगावॅट वीज मिळणार आहे. आगामी काळात या प्रकल्पाची क्षमात वाढवण्यात येणार असून अठाराशे मेट्रिक टन कचर्‍यापासून वीजनिर्मिती केली जाईल.

यामुळे सुमारे दररोज 8 ते 10 मेगावॅट वीज उपलब्ध होईल. या विजेमुळे देवानार प्रकल्पाची विजेची गरज भागणार असून आगामी काळात वाढीव विजेच्या विक्रीतून पालिकेला उत्पन्नही मिळणार आहे.

पहिला प्रकल्प 2024 पासून सुरू

देवनार डंपिंग ग्राऊंडवर सध्या 600 मेट्रिक टन कचर्‍यावर प्रक्रिया करून वीजनिर्मिती करण्याच्या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. हे काम पूर्ण करून वीज निर्मिती सुरू करण्यासाठी कंत्राटदाराला 40 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन 2024 मध्ये प्रत्यक्षात वीजनिर्मिती सुरू होईल अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या