सुरक्षारक्षकांचा चार महिन्यांचा पगार थकवला; सुरक्षारक्षक पुरवणाऱ्या कंपनीची मनमानी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वरळीच्या बीडीडी चाळ येथे समाजकल्याण विभागाच्या वसतीगृहावर कार्यरत असलेल्या आठ सुरक्षारक्षकांचे चार महिन्यांचे पगार कंपनीने थकवले आहेत. सुरक्षारक्षक पुरवणारी ही कंपनी असून कोरोनाचे संकट त्यात पगार थकवल्यामुळे सुरक्षारक्षकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

वरळी बीडीडी चाळ येथील इमारत क्रमांक 116 आणि 118 मधील समाजकल्याण विभागाच्या वसतीगृहावर गेली सात वर्षे 8 सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. हे सुरक्षारक्षक शीव येथील मे. क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड या कंपनीने नेमलेले असून त्यांचा पगार कंपनी देते. मात्र, फेब्रुवारी ते मे या चार महिन्यांचा पगार कंपनीने थकवला आहे. सुरुवातीला टाळाटाळ आणि नंतर कोरोनाचे कारण देत कंपनीने रक्षकांचा पगार रखडवला आहे. आता तर जून महिना अर्धा संपत आला आहे. कोरोनाच्या या संकट काळात आर्थिक परिस्थिती अधिकच ढासळली असून कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे कंपनीने तात्काळ थकीत पगार द्यावा, अशी मागणी सुरक्षारक्षक प्रकाश काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. आठ सुरक्षारक्षकांमध्ये तीन महिला सुरक्षारक्षकांचाही समावेश आहे.

कर्तव्य भावनेने काम करतोय!

आम्ही वरळी बीडीडी चाळीतच राहतो. त्यामुळे इथे जवळच्या जवळ सुरक्षारक्षकांचे काम मिळाल्याने आम्ही समाधानी होतो. पगार कमी असला तरी तो वेळच्यावेळी कधी मिळाला नाही. मात्र, आता तर चार महिने झाले असून त्यात कोरोनामुळे अधिकच वाईट परिस्थिती आहे. मुलामुलींचे वसतीगृह असल्यामुळे पगार मिळाला नाही तरी त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही कर्तव्य भावनेने काम करत आहोत. कंपनीने एक महिन्याचा पगार दिला तरी एक वेळचे जेवून कशीबशी गुजराण होऊ शकेल. तरी कंपनीने याबाबत काही सकारात्मक तोडगा काढावा आणि आमचा पगार द्यावा, अशी मागणी या सुरक्षारक्षकांनी केली आहे.

कंपनीकडून कोणताही प्रतिसाद नाही!

कंपनीचे व्यवस्थापक तसेच इतर अधिकाऱ्यांना फोन करून आम्ही पगाराबद्दल विचारले असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. पगार होईल, पगार होईल, असे सांगत टाळाटाळ केली जात आहे. मात्र, आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, घरची परिस्थिती खूपच बिकट झाली असून रोजच्या जीवनावश्यक वस्तू आणि आजारपणासाठी शेजाऱ्यांकडून पैसे उसने घ्यावे लागत आहेत, अशी माहिती महिला सुरक्षारक्षक शिल्पा घोरपडे यांनी दिली.