
महाविकास आघाडीकडे जवळपास 170 पेक्षा जास्त आमदारांचे पाठबळ आहे. मात्र मागील काही दिवसात भाजपाच्या नेतेमंडळींनी पंढरपुरात येऊन तुम्ही इथला आमदार निवडून द्या, राज्यातलं सरकार पाडून दाखवतो, अशी वक्तव्ये केली जात आहेत. मात्र सरकार बदलणे म्हणजे येड्या गबाळ्याचे काम नाही. स्वत:चे आमदार आमच्याकडे येण्यासाठी धडपडत असल्याने ते भाजपात थांबावे म्हणून भाजपाकडून अशा सरकार बदलाच्या वावड्या उठवल्या जात असल्याचा पलटवार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपुरात केला आहे.
पंढरपुरात महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संजय शिंदे, आमदार यशवंत माने, शिवसेनेचे संभाजी शिंदे, दीपक साळुंखे, उमेश पाटील, राजेंद्र गवई, भगीरथ भालके आदी उपस्थित होते.
यावेळी अजित पवार म्हणाले की, पोटनिवडणुकीच्या माध्यमातून होत असलेलं राजकारण अत्यंत घाणेरड्या पद्धतीने होत आहे. भाजपकडून वारंवार ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमचा प्रस्ताव होता, असा चुकीचा अपप्रचार सुरू आहे. मात्र भाजपाकडून आधी उमेदवार जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीला आपला उमेदवार जाहीर करावा लागला, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले.
यावेळी मागील काही प्रचार सभांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रातून मंगळवेढा पाणीपुरवठा योजनेसाठी निधी आणतो, अशी वक्तव्ये केली. मात्र मागील पाच वर्षे राज्यात व केंद्रात त्यांचेच सरकार होते. त्यावेळी त्यांना कुणी अडविले होते, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.
दरम्यान, मागील दोन दिवस जिल्ह्यात झालेल्या गारपीटीची अजित पवार यांनी प्रचार सभेला येताना पाहणी केली. त्याचे पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पीकविम्याच्या तारखा वाढविण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. विठ्ठल कारखाना पवार कुटुंबियांना घ्यायचा आहे, ही अफवा चुकीची असून जिल्ह्यातील अडचणीत असलेल्या विठ्ठल, चंद्रभागा, भीमा कारखान्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकार मदतीसाठी प्रयत्नशील असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
सरकार बदलणे म्हणजे दररोज जाकीट बदलण्यासारखे नाही. कर्नाटक, मध्यप्रदेशात शक्य झाले म्हणजे ते महाराष्ट्रात शक्य होईल, असे नाही. स्वत:चे लोक फुटतील म्हणूनच भाजपाकडून वारंवार सरकार बदलाचे गाजर दाखविले जात असल्याची टिका अजित पवार यांनी केली. भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांनी अनेक ठिकाणी रस्त्याची चुकीची कामे केली आहेत. त्या रस्त्यांचा निधी केंद्र सरकारचा असला तरी त्याची चौकशी लावली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
चंपाचे ऐकू नका – अजित पवार
चंद्रकांत पाटील म्हणजे चंपा. यांनी आजपर्यंत ग्रामपंचायत, सोसायटी, झेडपी अशा निवडणुका लढविल्या नाहीत. साधी एखादी सहकारी संस्था स्थापन केली नाही. ती चालविण्याचा त्यांना अनुभव नसताना केवळ नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या झंजावाताची लॉटरी त्यांना लागली असल्याने ते राज्यात प्रमुख पदावर आहेत. हे त्यांनी विसरू नये. त्यामुळे दररोज वेगवेगळी विधाने, टिका करताना त्यांची ती फारसे गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ते मतदारसंघात फिरत आहेत. त्यांचे काहीही ऐकून घेण्याची गरज नसल्याची टिका अजित पवार यांनी केली.

































































