
मीना आंबेरकर
माणसाला प्रत्येक गोष्टीचा शेवट हा गोड असावा असे अपेक्षित असते, मग ते नाटक, सिनेमा असो, कथाकादंबरी असो तसेच भोजनाचा, विशेषतः शाही भोजनाचा शेवट हा बेताच्या गोड व सुरेख पदार्थाने व्हावा असे वाटते. किंबहुना, पाश्चात्त्य मेजवानीत ही प्रथा प्रचलित आहे. दिसायला सुरेख सजावट केलेले डेझर्ट किंवा पुडिंग खाताना मन प्रसन्न होते. हे पुडिंग बेताचे गोड आणि पचायला हलके असावे याकडे कटाक्ष असतो. तसेच हे डेझर्ट पुडिंग करताना जेवणातील पदार्थाचा, ऋतूंचा विचार केला जातो. उन्हाळय़ाच्या दिवसांत थंड तर थंडीच्या दिवसांत गरम डेझर्ट घ्यावीत. गरम डेझर्टमध्ये पुडिंग फार योग्य असे डेझर्ट वाटते. पुडिंग करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. उदा. पुडिंगमध्ये वापरायची अंडी ही फ्रीजमधील असू नयेत. ती तासभर तरी बाहेर ठेवावीत. तसेच अंडय़ातील पांढरे फेटताना त्यात अंडय़ाचा पिवळा भाग किंवा पाण्याचा अंश येणार नाही अशी खबरदारी घेतली पाहिजे. फेटलेले पांढरे पदार्थात मिसळताना ते हलक्या हाताने व एकाच दिशेने एकत्र करावे. म्हणजे हवा आत जाऊन पदार्थावर हलकेपणा येतो. इसेन्स बेताच्या प्रमाणात वापरावे. या गोष्टी लक्षात ठेवून आपण काही पुडिंगच्या रेसिपीज पाहूया.

ब्रेड पुडिंग
साहित्य...दूध अर्धा लिटर, अंडी दोन, साखर पाऊण वाटी, लोणी एक डाव, पाव चार स्लाईसेस, व्हॅनिला, पाव चहाचा चमचा किशमीस.
कृती…साखर विरघळेपर्यंत दूध-साखर गरम करून घ्या. त्यात पावाचे बारीक तुकडे करून भिजत घाला. अंडी घुसळा. दूध पावात चमच्याने चांगली मिसळा. व्हॅनिला इसेन्स घाला. तूप लावलेल्या सपाट भांडय़ात मिश्रण घाला. वर लोण्याचे छोटे छोटे गोळे घाला. खिसमिस घाला. गरम ओव्हनमध्ये 200 अंश सेंटिग्रेडवर भाजा किंवा कुकरमध्ये घट्ट होईपर्यंत वाफवा. गरम गरम सर्व्ह करा.

शाही तुकडा
साहित्य...7 ते 8 ब्रेड स्लाईस, 3 ते 4 टीस्पून बटर, थोडे केशर, 1 लिटर आटवलेले दूध, मिल्क मसाला, बदाम-पिस्त्याचे तुकडे तळण्याकरिता तूप.
कृती...1 ब्रेडचे 6 तुकडे करून घ्या. ते तुकडे तुपात तळून घ्या. तळलेल्या ब्रेडला थोडे बटर लावा. एका पसरट भांडय़ात ब्रेडचे स्लाईस लावून घ्या. त्यावर आटवलेले दूध टाका. दूध आटवताना त्यात मिल्क मसाला, केशर टाकून आटवून घ्या. नंतर 8 ते 10 टीस्पून साखर टाकून गॅस बंद करा. पुन्हा ब्रेड स्लाईस ठेवा व उरलेले सर्व दूध टाकून त्यावर केशर, बदाम-पिस्ता काप लावा. 4 ते 5 तास थंड करीत ठेवा.

ऍपल पुडिंग
साहित्य...3-4 सफरचंद, 2 कप फेसलेले क्रीम, 4-5 टीस्पून दळलेली साखर, 4-5 टीस्पून साधी साखर, 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स, थोडा गुलाबी रंग, 13-15 मारी बिस्किटे, 4-5 चेरी, 4 ते 5 पिस्ता.
कृती…सफरचंदाची साले काढून व किसून घ्या. त्याला 1/2 टीस्पून इसेन्स, साधी साखर टाकून एकत्र करा. 2 ते 3 मिनिटे गॅसवर ठेवून साखर विरघळली की, गॅस बंद करा. मारी बिस्किटे मिक्सरमध्ये टाकून त्याची पावडर करा. तयार क्रीममध्ये दळलेली साखर 1/2 टीस्पून इसेन्स टाका. तयार क्रीममधील अर्धा भाग एका बाऊलमध्ये घेऊन त्यात गुलाबी रंग टाका. एका पारदर्शक बाऊलमध्ये सफरचंदाच्या मिश्रणाचा अर्धा भाग टाका. थोडे दूध शिंपडून हलक्या हाताने थोडे दाबून गुलाबी रंगाचे क्रीम टाका. पुन्हा उरलेले तिन्ही लेयर ठेवून घ्या. वरील पांढऱया क्रीमवर चेरी पिस्त्याचे उभे काप टाका. फ्रीजमध्ये 5 ते 8 तास सेट होण्यासाठी व थंड होण्यासाठी ठेवा.

मेक्सिकन पुडिंग
साहित्य…एक संत्रे, अर्धी वाटी द्राक्षे, दोन चिकू, चार चमचे साखर, ग्लुकोजची आठ-दहा बिस्किटे, ब्रेडचे चार स्लाईस, कस्टर्ड पावडर दोन चमचे, एक कप दूध, एक कप क्रीम लिंबू.
कृती...सर्व फळे बारीक चिरून त्याला थोडा लिंबाचा रस लावून ठेवा. एक कप दुधात कस्टर्ड तयार करा. पावाच्या दोन स्लाईस ठेवाव्यात. त्यावर चार-पाच बिस्किटे चुरून घालावीत. त्यावर कस्टर्ड घालावे. मग त्यांच्यावर फळांचे तुकडे घालावेत. नंतर राहिलेल्या पावाच्या दोन स्लाईस घालाव्यात व त्यावर राहिलेला बिस्किटांचा चुरा घालावा. त्यावर क्रीम ओतावे. चेरीचे डेकोरेशन करून ही डिश फ्रीजमध्ये सहा तास ठेवून द्यावी.त

























































