देव रामेश्वर निघाले शिवाजी महाराजांच्या भेटीला

455

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिमाया भवानी माता यांच्या ऐतिहासिक पारंपारिक त्रैवार्षिक भेट सोहळ्यासाठी कांदळगावचे ग्रामदैवत स्वयंभू देव रामेश्वर वारेसुत्र, तरंग व रयतेसह 14 फेब्रुवारी सकाळी 9 वाजता कांदळगाव येथून सिंधुदुर्ग किल्ल्याकडे रवाना होणार आहे. या अनोख्या भेट सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन श्री देव रामेश्वर देवस्थान व परिसर देवालये विश्वस्त मंडळ, मानकरी व ग्रामस्थांनी केले आहे. यावर्षी भेटीचा हा सोहळा 14 व 15 फेब्रुवारी या दोन दिवशी रंगणार आहे.

भेट सोहळ्याच्या पूर्वसंध्येला कांदळगाव येथील रामेश्वर मंदिरात ‘गाथा कांदळगावची, महती रामेश्वराची’ (लेखक – उमेश दिनकर कोदे) यांच्या पुस्तकाचे मान्यवराच्या हस्ते प्रकाशन झाले. रात्री सद्गुरू भजन मंडळ अणसुर यांचे शिवशाहीवर आधारित संगीत भजन संपन्न झाले.14 रोजी सकाळी 9 वाजता देव रामेश्वर यांचे वारेसुत्र तरंग व रयतेसह मालवण येथे प्रयाण करणार आहेत. दुपारी 12 वाजता जोशी मांड मेढा मालवण येथे प्रस्थान करणार, दुपारी 12 वाजल्या नंतर किल्ले सिंधुदुर्ग येथे देव रामेश्वर, शिवाजी महाराज व आदिमाया भवानी माता यांचा ऐतिहासिक भेट सोहळा होणार आहे. सायंकाळी 4 वाजल्यानंतर देव दांडेश्वर मंदिराची भेट घेऊन त्यानंतर मौनीनाथ मंदिर, मेढा मालवण येथे श्री देव रामेश्वर मुक्काम करणार आहे. 15 रोजी सकाळी 8 वाजल्यानंतर कुशेवाडा मेढा येथे प्रकाश कुशे यांच्या घरी कुशे कुटुंबियांना पारंपरिक भेट व आशीर्वाचन, सकाळी 10 वाजल्या नंतर रामेश्वर मांड बाजारपेठ येथे आगमन, दुपारी 12 वाजल्या नंतर रामेश्वर मांड मंडळा तर्फे उमेश नेरुरकर यांच्या निवासस्थानी महाप्रसादाचे आयोजन, सायंकाळी 4 वाजता रामेश्वर मांड येथून रामेश्वर मंदिर कांदळगाव येथे प्रयाण होणार आहे.

सोहळ्यानिमित्त भाविकांना सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी सिंधुदुर्ग प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशन मालवण, शिवशक्ती जलपर्यटन संस्था मालवण, रामचंद्र महादेव आचरेकर यांच्या संयुक्त विद्यमाने बोटींची मोफत व्यवस्था केली आहे. सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन देव रामेश्वर देवस्थान व परिसर देवालये विश्वस्त मंडळ मानकरी व ग्रामस्थानी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या