
देवळाली प्रवरा येथील भांडवस्ती येथे शनिवारी सकाळी तीन कावळे मृतावस्थेत सापडल्याने खळबळ उडाली असून, पशुवैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्छेदन करून कावळ्याच्या घशातील स्राव प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविला आहे. सोमवारी अहवाल आल्यानंतर कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूने झाला की अन्य कारणामुळे झाला, हे समजणार आहे.
देवळाली प्रवरा येथील सोपान भांड यांच्या वस्तीवर शनिवारी सकाळी तीन कावळे मृतावस्थेत आढळले. तीनपैकी दोन मृत कावळ्यांवर कुत्र्यांनी ताव मारला, तर एका कावळ्याजवळ काहीजणांनी थांबून नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजित निकत व उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे यांना माहिती दिली. मुख्याधिकारी निकत व उपनगराध्यक्ष संसारे यांनी पशुवैद्यकीय विभागाला या घटनेची माहिती दिली.
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अमर प्रसाद माने यांनी आपल्या पथकासह देवळाली प्रवरा येथील भांडवस्ती येथे भेट देऊन मृतावस्थेतील कावळ्याची पाहणी केली. डॉ. माने यांनी कावळ्याचे जागेवरच शवविच्छेदन करून कावळ्याच्या घशातील स्राव घेऊन पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविला आहे.
त्याचा अहवाल सोमवारपर्यंत मिळण्याची शक्यता आहे. प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच कावळ्याचा मृत्यू बर्ड फ्ल्यूने झाला की अन्य कशाने झाला, हे समजणार आहे.






























































