
कोकणात पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडतो. असे असले तरीही रत्नागिरी जिल्ह्याच्या विविध भागात फेब्रुवारी महिन्यापासून पाणी टंचाई जाणवू लागते. याबाबत शासनस्तरावर अनेक प्रयत्न करुन पाणी योजनांसाठी निधी मंजूर केला जातो. मात्र, या निधीचे योग्य नियोजन केले जात नसल्याने पाणी अडवून उभारलेले बंधारे कोरडे पडतात. संगमेश्वर तालुक्यातील धामापूर सप्रे वाडीत सात लाख रुपये खर्चून बंधारा उभारण्यात आला. मात्र, हा बंधारा गाळाने भरला असल्याने यात ना पाणी अडते ना ग्रामस्थांना याचा काही उपयोग होत अशी स्थिती झाली आहे.
पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी नोव्हेंबर महिन्यापासून ग्रामपंचायतीमार्फत गावातील ओढ्यांवर आवश्यक ठिकाणी बंधारे बांधण्याची मोहिम हाती घेतली जाते. मात्र, यातील बहुतेक बंधारे हे काही कालावधीतच निरुपयोगी ठरतात. बंधारा दिसत असतो मात्र त्यात थेंबभरही पाणी नाही अशी स्थिती दिसून येते. तालुक्यात आणि पूर्ण जिल्ह्यात किती बंधारे बांधून झाले या आकडेवारीवरच मोठे समाधान मानले जाते. गेल्या अनेक वर्षात या स्थितीत बदल झालेला नाही. परिणामी फेब्रुवारी महिन्यापासून परत पाणी टंचाई असलेल्या गावात टँकरने पाणी पुरवठा करण्यावर भर दिला जातो.
सात वर्षांपूर्वी शासनाच्या पाणलोट विभागाने प्रत्येक गावात पक्के बंधारे उभारण्यासाठी लाखो रुपये खर्च केले. मात्र, दर्जाहिन बांधकाम, चुकीचे नियोजन , पाणी अडविण्याबाबतची अनास्था , परस्परातील वाद यासारख्या असंख्य कारणांमुळे काही गावात निकृष्ट बांधकामांमुळे हे बंधारेच जागेवर नाहीत. संगमेश्वर तालुक्यातील धामापूर सप्रे वाडीत असाच एक बंधारा सात लाख रुपये खर्चून उभारण्यात आला. मात्र, या बंधाऱ्यात त्याच्या उंची एवढा गाळ साचल्याने त्यात पाणी साठत नाही.
गावातील बंधाऱ्यांचा उपयोग जवळपासच्या विहिरींचे पाणी वाढावे. जनावरांना पाणी पिता यावे , महिलावर्गाला कपडे धुता यावे यासारख्या अनेक कारणांसाठी होत असतो. शासन आपल्या स्तरावरुन यासाठी दरवर्षी निधी मंजूर करते. मात्र, योग्य नियोजन , कामाचा निकृष्ट दर्जा , निधीच्या खर्चाबाबत अनियमितता यासारख्या अनेक कारणांमुळे पाण्याऐवजी बंधाऱ्यात निधी जिरतो आणि बंधारे कोरडेठाक रहातात. संगमेश्वर तालुक्यातील धामापूर सप्रे वाडीत सात लाख रुपये खर्चून उभारलेल्या बंधाऱ्यातील गाळ यावर्षी तरी काढण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.























































