ड्रोनचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करा – गृहमंत्री

463

गृहमंत्री अनिल देशमुख यावेळी म्हणाले की, जगभरात ड्रोन हल्ल्याच्या घटना घडत असल्याचे दिसून येते. हे एक नवीन आव्हान समोर आहे. याचा सामना करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करुन कार्यान्वित करण्याची गरज आहे. पोलीस खात्यामध्ये ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’चा वापर कसा करता येईल याचाही विचार व्हावा. नवी मुंबई मध्ये महापे येथे ‘महाराष्ट्र सायबर’च्या मुख्यालयाच्या कामाला गती द्यावी, असेही त्यांनी सांगितले.

राज्याच्या आर्थिक प्रगतीसाठी कायदा व सुव्यवस्था महत्त्वाची ठरते. सुव्यवस्था असलेल्या राज्यात आर्थिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणात येते. राज्य पोलीस दल उत्कृष्ट काम करत असल्यामुळे राज्यात चांगली गुंतवणूक होत आहे. नक्षलवादाचा सामना करण्यासाठी छत्तीसगड, तेलंगणासोबत समन्वयाने काम व्हावे. मानवी तस्करीच्या घटनांमध्ये संवेदनशीलपणे काम करुन अशा घटनांना आळा घालावा. अवैध सावकारीविरोधातही कठोर कारवाई करण्यात यावी.

पोलीस दलाने सतत नाविन्याचा शोध घेतला पाहिजे. काही शहरे, जिल्ह्यात पोलीस दलाने अत्यंत नाविन्यपूर्ण संकल्पना राबविल्या आहेत. मुंबईमधील मोबाईल पोलीस स्टेशन, पुण्यामधील स्वागत कक्ष, नागपूर पोलीसांची महिलांसाठीची ‘होम ड्रॉप स्कीम’ यासारख्या नाविन्यपूर्ण योजना राज्यात राबविल्या पाहिजेत, असे सांगून पोलीस भरती प्रक्रिया लवकर मार्गी लावण्यात येईल, असेही ते म्हणाले.

यावेळी गृहराज्यमंत्री (शहरे) सतेज उर्फ बंटी पाटील, गृहराज्यमंत्री ग्रामीण शंभूराज देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी केले. कायदा व सुव्यस्थेबाबत विविध विभागांच्या प्रमुखांनी सविस्तर सादरीकरण केले.

यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार यांच्यासह मुंबईचे पोलीस आयुक्त, पोलीस गृहनिर्माण, पोलीस कल्याण आदींचे महासंचालक, पोलीस महासंचालक कार्यालयातील विभागांचे सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी, राज्यातील शहरांचे पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक यावेळी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या