
खेड तालुक्यातील भोस्ते येथे राहणारे फैयाज चौधरी यांची जमीन व इतर व्यवहारात आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपावरून तबस्सूम सोलकर व शब्बीर मुल्लाजी रा. खेड यांच्याविरुद्ध खेड पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
यातील फिर्यादी चौधरी यांची स्वतःची चौधरी कंट्रक्शन नावाची कंपनी असून ते बिल्डिंग कन्ट्रक्शनचे काम करतात. चौधरी यांचा मित्र आदिल चव्हाण यांच्या माध्यमातून मुंबई येथे तबस्सूम सोलकर व त्यांची ओळख झाली. त्यावेळी तबस्सुम सोलकर याने आपली भोस्ते गावातील पन्नास गुंठे जागा त्यांना विकसित करायची आहे, असे चौधरी यांना सांगून यासाठी त्यांच्याकडून 35 लाख रुपये घेतले. यानंतरही पुन्हा चौदा गुंठे जागा घेण्यासाठी 16 लाख रुपये घेतले.
या संपूर्ण प्रकल्पासाठी चौधरी यांनी दीड कोटींची गुंतवणूक केली. मात्र आरोपींनी फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली.या प्रकल्पात आपली फसवणूक झाल्याचे चौधरी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी खेड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. खेड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.






























































