भाट्ये आणि आरेवारे पर्यटनस्थळे विकासासाठी 5 कोटींचा निधी देणार – उदय सामंत

487

रत्नागिरी तालुक्यातील भाट्ये आणि आरेवारे ही दोन नवीन पर्यटनस्थळे विकसीत करण्यासाठी प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. आरेवारे येथे केंद्र सरकारने परवानगी दिल्यास त्याठिकाणी प्राणी संग्रहालय उभारण्यात येणार आहे. मार्लेश्वर तीर्थक्षेत्र आणि माचाळच्या विकासासाठी भरीव निधी देण्यात येणार आहे. तसेच छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, लोकमान्य टिळक स्मारक आणि परिसराच्या विकासासाठी सहा महिन्यात प्रस्ताव तयार करुन त्यासाठीही निधी उपलब्ध करुन देणार आहेत. जयगड आणि पूर्णगड किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व कायम ठेवून या किल्ल्यांची डागडूजी करण्यासाठीही निधी देण्याचा निर्णय मुंबईतील बैठकीत झाल्याचे उच्च व तंत्रक्षिणमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषदेत सांगितले.

मुंबईमध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासंदर्भात एक बैठक झाली. या बैठकीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, लांजा, गणपतीपुळे, दापोली या विश्रामगृहांचे नुतनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पर्यटन वाढीसाठी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सी वर्ल्ड प्रकल्प बाराशे एकराऐवजी चारशे ते पाचशे एकरात उभारण्याचा निर्णय झाला. त्यासाठी निधी देण्यात येणार आहे. मच्छिंद्र कांबळी स्मारकासाठी तसेच श्रीमंत शिवरामराजे भोसले वसतीगृहासाठी निधी देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. आंगणेवाडी जत्रेसाठी लाखो भाविक येतात. आंगणेवाडी तीर्थस्थळाच्या आजूबाजूचा परिसर सुशोभित करण्यासाठी 12 कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. कुणकेश्वर मंदिर सुशोभिकरणाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. चांदा ते बांदा योजना बंद केल्याच्या अफवा उठवल्या गेल्या आहेत. मात्र ही योजना बंद झाली नसून त्या योजनेची पडताळणी सुरु आहे. त्यानंतर ही योजना पुन्हा सुरु होईल असे आश्वासन सामंत यांनी यावेळी दिले.

यंदा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये 5 हजार मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला. अतिवृष्टीच्या निधीच्या मागणीचे प्रस्ताव देण्यात आले आहेत. दोन्ही जिल्ह्यांचे प्रत्येकी 42 कोटी रुपयांचे निधीचे प्रस्ताव आहेत. त्यापैकी 15 ते 20 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून उर्वरित निधीही देण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. शिवनेरी किल्ल्याप्रमाणेच जयगड आणि पूर्णगड या किल्ल्यांची डागडूजी करण्यात येणार आहे. पाखाडीसाठी 20 लाख रुपयांची तरतूद होती. जिल्हा नियोजनच्या बैठकीत ती 35 लाख रुपये करण्यात आली होती. मुंबईत झालेल्या बैठकीत पाखाडीसाठी 50 लाख रुपयांचा निधी देण्याचा निर्णय झाला. त्यामुळे बनवलेल्या मजबूत पाखाडीवरुन एसटी व अन्य वाहने जाऊ शकतील. 50 लाखांच्या वरील निधी नाबार्ड निधी म्हणून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सातबारा दाखले ऑनलाईन देण्यासाठी तलाठ्यांना दीड कोटी रुपयांचे लॅपटॉप देण्याचा निर्णय झाला होता त्यानंतर अजून एकही दाखला ऑनलाईन निघालेला नाही. पुन्हा लॅपटॉपसाठी 1 कोटी 10 लाख रुपयांची तरतूद करण्याचा प्रयत्न होता, तो आम्ही हाणून पाडला. खरेतर या प्रकरणाची चौकशी झाली पाहीजे अशी माझी मागणी आहे असे ते म्हणाले. कुठे आहेत ते लॅपटॉप असा सवालही सामंत यांनी उपस्थित केला.

आपली प्रतिक्रिया द्या