
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा मी पुन्हा येईनचा राग आळवला. महाविकास आघाडी सरकारचा कार्यकाळ संपल्यानंतर आम्ही पुन्हा सत्तेत येऊच असा सूर लावला. माथाडी कामगारांचे नेते अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने माथाडी भवनमध्ये आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते.
माथाडी कामगारांच्या प्रश्नासंदर्भात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही सत्तेत असताना माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकारने आपले दरवाजे उघडे ठेवले होते. हे प्रश्न सोडवण्याची संधी आता राज्यातील विद्यमान महाविकास आघाडी सरकारला आहे. हे सरकार माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवेल, असा आपल्याला विश्वास आहे. जर या सरकारने कामगारांचे प्रश्न सोडवले नाही तर ते आम्ही ते नक्कीच सोडवू. कारण या सरकारच्या कार्यकाळानंतर सत्तेत आम्हीच येणार आहोत, असे ते म्हणाले. याप्रसंगी केंद्रीय कामगारमंत्री भूपेंद्र यादव, आमदार शशिकांत शिंदे, मंदा म्हात्रे, गणेश नाईक, नरेंद्र पाटील उपस्थित होते.




























































