फडणवीस ‘बोनस’ची वाट बघतायत!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मी पुन्हा येईन, पुन्हा येईन असं म्हणत सत्तेची स्वप्न पाहणारे देवेंद्र फडणवीस आता ‘बोनस’ची वाट बघतायत. त्यासाठी राज्यातील आघाडी सरकारविरोधात आगामी काळात रस्त्यावर उतरून एल्गार पुकारण्याचा इशारा फडणवीस यांनी दिला.

भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज मुंबईत पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी पुन्हा सत्तेचा सूर आळवला. राज्यातलं सध्याचं सरकार सर्वच पातळ्यांवर फोल ठरत असून जनतेच्या कल्याणाकरता आपल्याला मैदानात उतराव लागेल. सत्ताधाऱयांना पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पाणी पाजू आणि 2024 आधी राज्यात आपलं सरकार जर आलंच तर ते आपण ‘बोनस’ समजू. त्या परिस्थितीतही उत्तम पर्याय देण्याचं काम आपण करू. पण येत्या काळात राज्यात स्वतःच्या भरवशाचं आणि आपलं सरकार आणून दाखवू असं सांगत यांनी पुन्हा सत्ता मिळण्याच स्वप्न भाजप कार्यकर्त्यांना दाखवलं.

नांदेड, अमरावती, मालेगावात घडलेली घटना साधी मानू नका. हा एक प्रयोग आहे. देशात अराजक निर्माण करण्यासाठी, केंद्र सरकारविरोधात विचारपूर्वक केलेला प्रयोग आहे. दिल्लीतील एका रेफ्युजी कँपला लागलेल्या आगीचा फोटो दाखवून त्रिपुरात कुराण जाळण्यात आल्याचं सांगितलं जातं. जुन्या मिरवणुकीचे फोटो दाखवून हिंदू मोठय़ा प्रमाणात मुस्लिमांवर अन्याय करत असल्याचा आरोप केला जातो. दुःखद बाब ही की देशाचे एक मोठे नेते राहुल गांधी यासंदर्भात एक ट्विट करतात आणि त्यानंतर महाराष्ट्रात मोर्चे निघतात, असा आरोप फडणवीस यांनी केला.