मुंबईतील कोळीवाड्यांच्या विकासासाठी विशेष डीसीआर, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील कोळीवाडे हे आपले वैभव आहे. या कोळीवाडय़ांचे सीमांकन करण्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. या कोळीवाडय़ांच्या विकासासाठी विशेष विकास नियंत्रण नियमावली (डीसीआर) तयार करण्यात आली आहे. हा विकास करताना कोळी समाजाला विश्वासात घेतले जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. यासंदर्भात संबंधित लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात येईल, असेही फडणवीस म्हणाले.

शिवसेनेचे सचिन अहिर यांनी तारांकित प्रश्नोत्तराच्या तासाला शिवडीतील कोळीवाडय़ामध्ये होत असलेल्या एसआरए योजनेची माहिती देत कोळीवाडे-गावठाणांत राहणाऱया मूळ भूमिपुत्रांना न्याय द्यावा. त्यांना एसआरएमध्ये टाकून उद्ध्वस्त करू नका, मुंबईचे मूळ मालक असलेल्या भूमिपुत्रांसाठी धोरणात्मक निर्णय घ्या, अशी मागणी केली. त्यावर फडणवीस म्हणाले, शिवडीत सरकारी जमिनीवर उभ्या राहिलेल्या झोपडपट्टीसाठी ही एसआरए योजना आहे. कोळीवाडे आणि गावठाण्यांच्या जमिनीवर अशा योजना राबवल्या जाणार नाहीत. कोळीवाडा, गावठाणांना सीआरझेड लागू होत नाही. सध्याच्या नियमांनुसार कोळी बांधवांना घरांच्या दुरुस्तीसाठी परवानगी देण्याच्या सूचना विभागाला दिल्या जातील तसेच त्यांना अधिकचा एफएसआय देण्याबाबतही सरकार सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, भाई जगताप, भाई गिरकर, कपिल पाटील, जयंत पाटील यांनी कोळीवाडे आणि गावठाण यांच्या विकासाची मागणी लावून धरली. मुंबईत 47 कोळीवाडे आणि 47 गावठाणे असून त्यांना एसआरए योजनेत ढकलू नका, काही कोळीवाडय़ांचे सीमांकन अजूनही अपूर्ण आहेत. ते पूर्ण करा, सध्याच्या डीसी रूलमध्ये त्यांचा समावेश करा, त्यांना जास्त एफएसआय द्या तसेच याबाबत एका बैठकीचे आयोजन केले जावे, अशी मागणी या सदस्यांनी केली.