
समृद्धी महामार्गावर अपघात घडवणारे स्पॉट आहेत, अशी धक्कादायक माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. अपघात टाळण्यासाठी प्रवेश मार्गावरच वाहनांची तपासणी केली जाईल तसेच महामार्गावर ट्रफिक मॅनेजमेंट सिस्टम लावली जाईल अशी घोषणाही फडणवीस यांनी केली.
समृद्धी महामार्ग हा देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जातो. 12 मार्च रोजी समृद्धी महामार्गावर मेहकरजवळ झालेल्या अपघातात छत्रपती संभाजीनगर येथील एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला होता. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि मेहकरचे आमदार संजय रायमुलकर यांनी हा मुद्दा सभागृहात मांडला. समृद्धी महामार्गावर शिवणी गावाजवळ असलेल्या पुलावर मोठे कचके बाजूला पडलेले आहेत. जलदगतीने वाहन जात असताना ते चालकाच्या लक्षात येत नाहीत. वाहन पुलावर गेले की, चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटते. रविवारी झालेल्या अपघातात त्या वाहनाने चार पलटय़ा घेतल्या. अशी अनेक अपघातप्रवण ठिकाणे महामार्गावर असून ती दुरुस्त करावीत अशी मागणी त्यांनी केली. समृद्धी महामार्गावर असलेल्या अपघातप्रवण स्थळांवर उपाययोजना करणार का? अपघातात जे मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक सहाय्य देणार का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. मंत्री शंभूराज देसाई यांनी यावर सभागृहात निवेदन केले. समृद्धी महामार्गावर रविवारी सकाळी 8 वाजून 5 मिनिटांच्या सुमारास अपघात झाला. त्यात सहा जणांचा मृत्यू झाला. संबंधित वाहनातून 13 व्यक्ती प्रवास करत होत्या. अतिवेग आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटणे ही अपघाताची प्राथमिक कारणे आहेत.
ट्रफिक मॅनजमेंट सिस्टम लावणार
मुळात समृद्धी महामार्ग सरळ आहे. त्याला वळणे अल्प आहेत. काही जागांवर मध्यंतरी माकडांचा वावर होता. अशा जागांची माहिती गोळा केली आहे, सुधारणा चालू आहे. आता इंटेलिजेंट ट्रफिक मॅनजमेंट सिस्टम लावत आहोत. त्यामुळे ओव्हरस्पीड, अपघात घडेल अशा जागा सिद्ध झाल्या असतील तर त्याची पूर्वसूचना वाहनचालकांना देता येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

























































