
महाराष्ट्राच्या मतदार यादीमध्ये दुबार-तिबार मतदार असल्याचे विरोधी पक्षांचे नेते पुराव्यानिशी सांगत आहेत. आता दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. मतदार यादीत दुबार मतदार असल्याची कबुली फडणवीस यांनी दिली आहे. सातत्याने होणाऱ्या स्थलांतरामुळे एका मतदाराचे नाव दोन-तीन ठिकाणच्या मतदार यादीत असणे शक्य असल्याची सारवासारवही त्यांनी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी ‘वर्षा’ निवासस्थानी दिवाळीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधी पक्षाकडून होत असलेल्या मतचोरीच्या आरोपासंदर्भातील प्रश्नांना उत्तरे दिली.
मुंबईत मोठय़ा प्रमाणात विकास होत असल्याने नागरिकांचे एका भागातून दुसऱ्या भागात स्थलांतर होण्याचे प्रमाणही वाढले आहे. आज मालाडला राहणारी व्यक्ती उद्या कांदिवलीत असते. त्यामुळे एका व्यक्तीचे नाव अनेक ठिकाणी मतदार यादीत असू शकते, असे फडणवीस म्हणाले.
z मतदार याद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी मीसुद्धा निवडणूक आयोगाकडे गेलो होतो. माझीही एक केस अजून प्रलंबित आहे, असे त्यांनी सांगितले. प्रारूप मतदार याद्या अंतिम करण्यापूर्वी हरकती व सूचना मागवल्या जातात. त्यावेळीच विरोधी पक्षाने त्या नोंदवायला हव्या होत्या, असे फडणवीस म्हणाले.




























































