
सामना प्रतिनिधी, मुंबई
राज्यातील जनतेसाठी महत्त्वाचे निर्णय ज्या बैठकीत घेतले जातात त्या बैठकीलाही भाजप मंत्री लेटलतिफच असल्याचे समोर आले आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल भाजपच्या मंत्र्यांची कानउघाडणी केली आहे. यापुढे उशीर झाल्यास मंत्र्यांना मंत्रिमंडळ बैठकीचे दरवाजे बंद केले जातील, असा दमच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मंत्र्यांना भरला आहे.
मंत्रिमंडळाच्या होणाऱ्या बैठकीला भाजपच्याच मंत्र्यांनी फार गांभीर्याने घेणे सोडले आहे. महिनोन् महिने या मंत्र्यांची दांडी मारणाऱ्या मंत्र्यांची संख्याही वाढली. ही बाब मुख्यमंत्र्यांच्या लक्षात येताच त्यांनी या मंत्र्यांची चांगलीच हजेरी घेतली. बैठकीपेक्षा कोणतेही काम महत्त्वाचे नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी समज दिली. मंत्री म्हणून काम करायचे असेल तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत भूमिका मांडणे महत्त्वाचे असते असे फडणवीस यांनी सांगितले. भाजपचे अनेक मंत्री कोणतीही पूर्वसूचना न देता बैठकीला उशिरा येतात. यापुढे बैठक सुरू झाल्यानंतर कॅबिनेट हॉलचे दरवाजे बंद केले जातील. त्यामुळे उशिरा आलेल्या मंत्र्यांना आतमध्ये प्रवेश मिळणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
शिवसेनेच्या मंत्र्यांचे कौतुक
शिवसेनेचे मंत्री मात्र या बैठकीला वेळेत हजर राहत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी नियमितपणे आणि वेळेवर मंत्रिमंडळाच्या बैठकीला येणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्यांचे कौतुकही केले. बैठकीला अन्य मंत्री उशिरा येत असले तरी शिवसेनेचे मंत्री मात्र हजर असतात. एखादा मंत्री न आल्यामुळे त्या खात्याचे निर्णय घेण्यात अडचणी येतात, मात्र या सगळ्यात शिवसेनेच्या मंत्र्यांची कोणतीही चूक नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.
summary -devendra fadnavis angry on non punctual bjp ministers



























































