फडणवीस मराठा नेत्यांना संपविण्याच्या तयारीत – मनोज जरांगे

भाजपमधील अनेक मराठा नेते मला फोन करून सांगतात की, त्यांना त्रास दिला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा नेत्यांना संपविण्याच्या तयारीत आहेत. आतापर्यंत मला 30 ते 32 आमदार व खासदारांचे फोन आले असल्याचे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. काहीही झाले तरी आम्ही 29 ऑगस्टला मुंबईत जाऊन आंदोलन करणारच, असा ठाम निर्धार जरांगे-पाटील यांनी सरकारला दिला आहे.

मनोज जरांगे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठय़ांचे नेते आणि मराठी अधिकारी संपकण्याच्या कामाला लागले आहेत. प्रत्येक मंत्र्यांना फडणवीस यांनी स्वतःचे ओएसडी दिले आहेत. भाजप पक्ष वेगळा होता; पण फडणवीस यांनी पक्षाची दिशा बदलली आहे. सत्तेसाठी त्यांनी नारायण राणे, अजित पवार, राधाकृष्ण विखे-पाटील, अशोक चव्हाण यांसारख्या अनेक नेत्यांना पक्षात घेतले. एवढेच नव्हे तर भाजपमधीलच अनेक नेते संपवण्याचे कामही सुरू आहे.

मनोज जरांगे म्हणाले, ‘मराठा समाज कुणबी आहे हे वारंवार सिद्ध झाले आहे. सातारा, मुंबई आणि हैदराबाद गॅझेटमध्ये मराठा समाजाचा कुणबी म्हणून उल्लेख आहे. त्यामुळे कुणबी म्हणून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे. आंदोलन काळातील गुन्हे अजूनही मागे घेतले नाहीत. त्यामुळे मराठा समाज एकवटून मुंबईत येणार आहे. गणेशोत्सवाचा काळ असला तरी आम्ही गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन, सरकारला सुबुद्धी दे आणि आरक्षणाचा प्रश्न सुटावा, यासाठी साकडे घालत आहोत.

मराठा नेत्यांचा दररोज फोन
सत्तेसाठी आपल्या लोकांना लाथा मारण्याचे काम सुरू आहे आणि माझ्याकडे त्याची यादी असल्याचा दावादेखील जरांगे-पाटील यांनी केला आहे. त्यांनी पुढे सांगितले की, जालन्यासह सोलापूर आणि नांदेड येथेही अनेक मराठा नेत्यांना त्रास दिला जात आहे. आमची परिस्थिती बिकट आहे, असे सांगणारे नेते दररोज संपर्क साधत आहेत; असा दावाही त्यांनी केला.

आंदोलनात दंगल घडविण्याचा अंदाज
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यामध्ये ओबीसींचा मेळावा घेऊन आपल्या आंदोलनामध्ये दंगल घडवण्याचा प्लॅन केला असल्याचा आरोपही जरांगे-पाटील यांनी केला आहे. फडणवीस कोणाचेच काम करत नाहीत. गोरगरीब असो ओबीसी असो की मराठा कोणाचेही आरक्षण किंवा काम ते पटकन करीत नाहीत. आता त्यांनी ओबीसीसाठी लढणार असल्याचे म्हटले आहे. मग मराठय़ांसाठी कोण लढणार? असा सवाल उपस्थित करत गोव्यामध्ये भाजपमधील ओबीसींच्या मेळाव्यात मुंबईला येणाऱ्या मोर्चामध्ये दंगल घडवण्याची आखणी केल्याचा अंदाज आहे. मात्र, मोर्चामध्ये काही झालं तर फडणवीस जबाबदार असतील, अस मनोज जरांगे-पाटील यांनी म्हटलं आहे.