हिंमत असेल तर फडणवीस यांनी लोकसभेची निवडणूक घ्यावी – नवाब मलिक

1075

विधानसभा निवडणुकीपेक्षा हिंमत असेल तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेची निवडणूक घ्यावी असे प्रतिआव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिले आहे. राज्यात महाआघाडीचे सरकार चांगल्या प्रकारे काम करत आहे. परंतु भाजपला अजूनही सत्तेचे स्वप्न पडत असल्याने ते रोज ऊठसूट काहीही विधान करत सुटले आहेत. काल नवी मुंबई येथे भाजप मेळाव्यात असेच एक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले त्या वक्तव्याचा नवाब मलिक यांनी चांगलाच समाचार घेतला.

राज्यात हातून सत्ता गेल्याने भाजपचे नेते सैरभैर झाले आहेत. भाजप नेत्यांना सत्तेचा आजार झाला आहे, दिवसभर सत्तेत कसा येऊ याचा विचार करतात, रात्री रोज त्यांना सत्तेची स्वप्न पडतात. यामुळे हा आजार वाढत जाणार, आम्हाला त्यांची काळजी वाटते. त्यामुळे त्यांनी चांगल्या डॉक्टरांकडून उपचार घ्यावा असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला.

भाजपाच्या काही लोकांना आमच्यात वाद आहेत असं दाखवण्याची सवय झाली आहे. बऱ्याच वृत्तवाहिन्या आणि पत्रकारांना आघाडी सरकारमध्ये वाद आहेत हे दाखवण्यात रस आहे, मात्र ते वास्तव नाही.आम्ही आघाडीतील सर्व मंत्री एकजुटीने काम करत असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.

सोमवारी राष्ट्रवादीची बैठक पक्षाचे अध्यक्ष शरद पवारसाहेबांनी बोलावली. ही बैठक आधीच ठरली होती. पवारसाहेबांनी सर्व मंत्र्यांचा आढावा घेण्याचे यापूर्वीच ठरवले असल्याने त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. त्यामुळे या बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती, मंत्र्यांचे कामकाज, नेत्यांना जबाबदारी यावर चर्चा करणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी यावेळी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या