
सामना ऑनलाईन । मुंबई
शिवसेना-भाजप आणि मित्रपक्षांच्या महायुतीची तयारी पूर्ण झाली आहे, आमची यादी तयार असून भाजपची यादी आज किंवा उद्या जाहीर होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. विरोधीपक्ष नेत्यांचा युतीकडे ओढा आहे असे सांगत “आगे आगे देखो होता है क्या” असे सूचक वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्याचे वक्तव्य महत्वाचे मानले जाते. त्यामुळे मुलगा सुजय पाठोपाठ राधाकृष्ण विखे पाटीलही भाजपमध्ये सामील होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
देशात 2014 च्या नरेंद्र मोदी यांच्या लाटेपेक्षा आता मोठी लाट असून मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एनडीएचे सरकार येणार असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. एअरस्ट्राईक बद्दल शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत पत्रकारांनी विचारले असता, “पवार साहेब मॅच्युअर आहेत, ते योग्य वक्तव्य करतील, मात्र त्यांच्या पक्षामध्ये अनेक इंमॅच्युअर लोकं आहेत ते काहीतरी बोलतात, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही” असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. भाजपच्या मीडिया सेलच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.



























































