पायाभूत सुविधांअभावी सरकारी शाळा ओस, तातडीने सुविधा उपलब्ध करून देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

शालेय शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या शाळा पायाभूत सुविधांअभावी ओस पडू लागल्या आहेत. अनेक शाळांमध्ये स्वच्छतागृहे आणि पिण्याच्या पाण्याची गैरसोय आहे. शैक्षणिक गुणवत्तेबाबतही प्रश्नचिन्ह आहे. याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी तातडीने सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.

जिल्हा परिषदा, महानगर पालिका आणि नगर पालिकांच्या शाळांमध्ये पायाभूत सुविधांची वानवा असल्याचा मुद्दा शासकीय शाळांच्या दर्जोन्नतीसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेल्या बैठकीत सरकारी शाळांची दुरवस्था समोर आली. यावेळी शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याबरोबरच शाळांना सुरक्षित आणि आरोग्यदायी करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यानंतरच शाळांमध्ये पाल्यांचा प्रवेश घेण्याचा पालकांचा कल वाढेल, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्या.

z शाळांना सुरक्षित कुंपण, शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, शाळा इमारतींचे बांधकाम व जीर्ण इमारतींची दुरुस्ती, विद्यार्थिनींसाठी आरोग्यदायी सुविधायुक्त ‘पिंक रूम’ असावी. त्याचबरोबर जेईई व नीट परीक्षा पूर्वतयारी उपक्रमाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावा अशा सूचनाही त्यांनी दिल्या.