
अतिवृष्टीने मराठवाडा अक्षरशः चिखलात गेला आहे. उभ्या पिकांची माती झाली आहे. मराठवाड्यासह राज्यात 70 लाख एकर पिके उद्ध्वस्त झाली असून बळीराजा मदतीसाठी याचना करत आहे. तरीही राज्यातील महायुती सरकार ‘आधी पंचनामे, नंतरच मदत’ हे तुणतुणे वाजवत आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीला सरकारने थेट केराची टोपली दाखवली. ओल्या दुष्काळाचे काय, असा उलट सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे, नियमामध्ये आहे ती सगळी मदत देऊ, असे ते म्हणाले.
अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात हाहाकार उडाला आहे. अनेक नद्यांना पूर आला असून 65 गावांचा संपर्क तुटला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पिकं पाण्यात आहेत. पावसाने आठ जणांचा बळी घेतला आहे तर 150हून अधिक जनावरं दगावली आहेत. पुढील दोन दिवस वादळी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने संकट अजूनही संपलेले नाही. या पार्श्वभूमीवर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी होत आहे. मात्र ओल्या दुष्काळाचे निकष नसल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले.
निवडणुकीनंतर मदतीचा आकडा घटला
मराठवाड्यात शेतात आणि घरातही काहीच राहिलेले नाही. आजवर कधीच झाला नाही इतका पाऊस झाला आहे. तरीही ओला दुष्काळ सरकार जाहीर करत नाही. निवडणुकीआधी तीन हेक्टरच्या मर्यादेत 13 हजार, 600 रुपये जिरायती शेतीला मदत दिली जात होती. मात्र असे काय झाले की निवडणुकीनंतर ही मदत कमी केली. आता ही मदत 8 हजार 500 रुपये दिली जाते. यातून सोयाबीनचे बियाणे, मजुरीचा खर्चही निघत नाही. निवडणुकीआधी सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले होते ते आता पूर्ण करावे. 2019च्या महापुरा वेळी कोल्हापूर आणि सांगलीला ज्या निकषांवर मदत केली त्याच निकषांवर मराठवाड्याला मदत केली पाहिजे, अशी मागणी होत आहे.
मंत्रिमंडळ बैठकीतही मागणी
ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी मंत्री आणि आमदार आग्रही आहेत. मात्र त्याकडे फारशा गांभीर्याने पाहिले जात नाही. मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रातील मंत्र्यांनीही ओल्या दुष्काळाची मागणी केली.
साडेचार हजार कोटी रुपयांपर्यंत नुकसानभरपाईचा आकडा जाणार
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. राज्य सरकारने आतापर्यंत 31 लाख 64 हजार शेतकऱ्यांना 2 हजार 215 कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे. यापैकी 1 हजार 829 कोटी रुपये जिल्हास्तरावर वितरित करण्यात आले आहेत, पण विविध भागातील नुकसानभरपाईचे पंचनामे अद्याप सुरू आहेत. त्यामुळे नुकसानभरपाईचा आकडा किमान साडेचार हजार कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुख्यमंत्री आज अतिवृष्टी भागाच्या दौऱ्यावर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत.
लगेच मदत द्यायला मी पैसे घेऊन फिरतो का? धाराशीवमध्ये ताफा रोखणाऱ्या शेतकऱ्यांवर महाजन चिडले
धाराशीवमध्ये आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांचा ताफा शेतकऱ्यांनी रोखला आणि मदत मागितली. त्यावर लगेच मदत द्यायला मी पैसे घेऊन फिरतो का, असे उत्तर त्यांनी दिले.