देवेंद्र फडणवीसांनी डबक्यात उतरू नये – संजय राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवेंद्र फडणवीस हे या राज्याचे विरोधीपक्षनेते असले तरी त्यांच्याकडे 116 आमदारांचं बळ आहे. इतका मोठा विरोधी पक्ष महाराष्ट्रात कधीही निर्माण झाला नव्हाता. त्यामुळे हा विरोधी पक्ष महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतो. अशी आमची भूमिका आहे. आणि फडणवीस यांच्यात ती क्षमता आहे. त्यांनी या राज्याच मुख्यमंत्री पद देखील सांभाळलं असल्याने त्यांना चांगला अनुभव आहे. परंतु आता महाराष्ट्राच्या राजकारणात जे डबकं झालय त्या डबक्यात त्यांनी उतरू नये. यामुळे त्यांची, त्यांच्या पक्षाची आणि मोदींची प्रतिष्ठा कमी होईल. असा त्यांना माझा एक मित्र म्हणून स्पष्ट सल्ला आहे. असे मत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. मंगळवारी पत्रकारांच्या प्रश्नांना ते उत्तर देत होते.

यावेळी ते म्हणाले की बंडखोर आमदारांना 11 जुलै पर्यंत गुवाहाटी मधील वातावरणाचा आनंद घेऊद्या. त्यांचे आता महाराष्ट्रात काही काम नाही. 11 तारखेनंतर आमच्या मागणीवर विचार होणार. गुवाहाटीत असणाऱ्या काही आमदारांना आम्ही अजूनही बंडखोर मानायला तयार नाही. आमचं त्या आमदारांसोबत आणि त्यांच्या नातेवाईकांसोबत बोलणं होत आहे. त्यांना ज्या परिस्थितीत तिथे नेण्यात आलं आहे, ते पाहता ते जोपर्यंत मुंबईत येत नाहीत तो पर्यंत आम्ही आशावादी आहोत. कालच्या न्यायालयाच्या निकालामुळे त्यांच्यात पुन्हा एकदा चलबिचल सुरु झाली आहे.

बंडखोर आमदारांच्या विरोधात लोकभावना तीव्र आहेत. नितीन देशमुखांच्या समर्थनार्थ आणि उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी काल अकोल्यात 25 हजार लोकं रस्त्यावर उतरली होती. लोकं उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरत आहेत. लवकरच ठाण्यामध्ये देखील हे चित्र दिसणार आहे. शिवसेनेला मानणारी जनता अशाप्रकारच्या कोणत्याही विचारला स्थान देत नाही. यामुळे आम्ही निश्चिंत आहोत. जर समोरचा कोणी वेट अँड वॉच करत असेल तर आम्ही देखील वेट अँड वॉच करत आहोत. असे राऊत म्हणाले.

राजभवनाच्या झाडी झुडुपात आणि राज्यपालांच्या टेबलावर 12 आमदार पडून आहेत. त्याबद्दल त्यांनी माहिती घ्यायला हवी. ते कामाला लागले असतील तर त्यांनी 12 आमदारांची फाईल मोकळी करावी. असे राऊत म्हणाले.

यावेळी बंडखोर आमदारांवर निशाणा साधताना ते म्हणाले की गुवाहाटीला जाण्याच्या काही दिवस आधीच काही आमदार माझ्याकडे शिवसैनिकांना घेऊन आले आणि शिवसेनेचा योद्धा म्हणून त्यांनी माझा सत्कार केला. इतकच नव्हे तर बिकेसीला जी सभा झाली त्या सभेआधी देखील काही आमदार माझ्याकडे आले, आणि तुम्ही जी लढाई करताय त्या लढाईचा एक गौरव म्हणून आम्ही तुम्हाला एका वीर योध्याप्रमाणे 400 मोटारसायकल आणि जीपमध्ये घेऊन जाऊ असे म्हणाले. काही जण आधी सुद्धा पक्ष बदलून आले आहेत तरी देखील उद्धव ठाकरेंनी त्यांना पक्षात घेतलं. यांच्यावर आता विश्वास कसा ठेवणार?

उद्धव ठाकरेंनी काय करायचं याचे सल्ले गुवाहाटीमध्ये बसून देऊ नका. इथे या आणि इथे बोला. एकनाथ शिंदे आमचे मित्र आहेत, सहकारी आहेत. ते शिवसेनेच्या कार्यकारिणीवर आहेत. अयोध्येलाही ते माझ्या सोबत होते. त्यांच्याविषयी माझ्या मनात वैयक्तिक कटुता नाही. आणि त्यांच्याही मनात माझ्याविषयी नाही. त्यामुळे ते महाराष्ट्रात व मुंबईत येऊ शकतात. असे राऊत म्हणाले.

महाराष्ट्राप्रमाणे इतर राज्यांमध्ये देखील सरकार पाडण्याचं काम सुरु आहे. पश्चिम बंगालमध्ये देखील सत्ताधारी पक्षातील काही लोकांना ईडीच्या नोटीस गेल्या आहेत. परंतु तुम्ही काहीही करा आम्ही घाबरणार नाही. कारण हा या देशामध्ये दुसऱ्या स्वातंत्र्याचा लढा आहे. पुढील काही दिवसांमध्ये मला पक्षाचे अनेक कार्यक्रम आहेत त्यामुळे मी ईडी कार्यालयात जाणार नाही. यादरम्यान ईडीला वाटलं तर ते मला जिथे आहे तिथून अटक करू शकतात. मी कायद्याच पालन करणारा माणूस आहे. त्यामुळे मी पक्षाच्या कार्यक्रमांमधून मोकळा होईन तेव्हा मी ईडीकडे जाईन. असे राऊत म्हणाले.

यावेळी दीपक केसरकरांवर निशाणा साधताना ते म्हणाले की, केसरकर हे बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेनेत आलेत. ते काय मला शिकवतात. त्यांनी सावंतवाडीमधून पुन्हा निवडून येऊन दाखवावं