भावी पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठवाडयाचा दुष्काळ दूर करण्यासाठी शासनाने दोन योजना आखल्या आहेत. मराठवाडा ग्रीडच्या माध्यमातून 64 हजार किलोमीटर पाईपलाईनद्वारे धरणे जोडूण पिण्यासाठी फिल्टरचे शुध्द पाणी जनतेला मिळणार आहे. 300 टी.एम.सी कोकणातील वाहून जाणारे पाणी लिफ्टद्वारे उचलून मराठवाडयातील गोदावरी नदीत सोडून नदीजोड प्रकल्पाद्वारे शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन देणार आहे. वॉटर ग्रीडसाठी 4 हजार कोटी रुपयाचे संभाजीनगर, जालन्याचे टेंडर निघाले असून लातूरचे टेंडर लवकरचे निघेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री फडणवीस महाजनादेश यात्रेनिमित्त अहमदपूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर बोलत होते. यावेळी विकास कार्य पुस्तिकेचे व कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले. व्यासपीठावर पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, खासदार सुधाकर श्रृंगारे, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, माजी आमदार गोविंद केंद्रे, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, आमदार सुरजितसिंह ठाकूर, प्रदेश सदस्य दिलीपराव देशमुख, अॅड. भारत चामे,नगराध्यक्षा आश्विनी कासनाळे,तालुकाध्यक्ष रामभाऊ बेल्लाळे, माजी जि.प. सदस्य त्र्यंबक गुट्टे,वसंतराव डिगोळे, चाकूर तालुकाध्यक्ष मेघराज बाहेती आदिची उपस्थिती होती.

फडणवीस म्हणाले की, आमदार विनायकराव पाटील यांनी 1600 कोटी रूपयाची कामे अहमदपूर विधानसभा मतदारसंघात आमदार विनायकराव पाटील यांनी केली. जनतेच्या दर्शनासाठी व आशिर्वादासाठी ही यात्रा काढण्यात आली. भाजपाची यात्रेची पंरपरा असून सत्तेत नसताना संघर्ष यात्रा, तर सत्तेत असताना जनसंवाद यात्रा काढतो. गोपीनाथ मुंडेनी संघर्ष यात्रा काढून महाराष्ट्र ढवळून काढला होता. भाजपाच्या यात्रेला मैदाने पुरत नाही. तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या यात्रेला मंगल कार्यालय भरत नाही असा टोलाही त्यांनी लगावला. काँग्रेस राष्ट्रवादीला जनतेने सत्ता देऊन बघितले आहे. निशाशेतून ते बिनबुडाचे आरोप करत आहेत. त्यांना जनतेने हरवले नसून इव्हीएम मशीनने हरवल्याचा आरोप ते करत आहेत. ते इव्हीएमला दोष देत आहेत. मोदींच्या कर्तृत्वामुळे भाजपाला जनता निवडून देत आहे. गोरगरीब जनतेला काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने पंधरा वर्षात जेवढा निधी दिला, तेवढा निधी पाच वर्षात भाजप सरकारने दिला. तर भाजपच्या सरकारने पाच वर्षात पन्नास हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले. बोंडअळी अनुदान, दुष्काळ अनुदान, अतिवृष्टी अनुदान दिले. मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील. शेवटच्या शेतकऱ्याची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत कर्जमाफी योजना सुरू रहाणार असल्याचे त्यांनी सांगितले. राहिलेल्या एका वर्षाचा विमा मिळवून देण्याचे वचन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. शेतीच्या सिंचनासाठी आराखडा तयार करून 25 टी.एम.सीचा पहिला आराखडा मंजूर करण्यात आला असून दुसरा आराखडा तयार करण्यात येत असल्याचे सांगितले.

mahajandesh-ahmedpur

रेल्वेचा प्रश्नासाठी राज्य सरकार पन्नास टक्के व केंद्र शासनाचे पन्नास टक्के निधी उपलब्ध करून देऊन रेल्वेची मागणी पूर्ण करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. 30 हजार किलोमीटरचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे रस्ते केले. 20 हजार किलोमीटर रस्ते राष्ट्रीय महामार्गाचे तर 10 हजार किलो मीटरचे राज्य मार्ग तयार केले. गरिबांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून धर्म, जात न पाहता गोरगरिबांना घरकुल दिले. 2021 पर्यंत एकही नागरीक कच्च्या घरात रहाणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. गायरान जमिनीवरील दहा लाख लोकांचे अतिक्रमण नियमित करून मालकी हक्क देऊन शहरात घरकूल बांधकामासाठी अडीच लाख रुपये देत आहोत. घर, गॅस, स्वस्त धान्य देत आहोत. उज्वला गॅस योजनेतून महिलांची सोय करण्यात आली आहे.

शिक्षण आणि आरोग्य विभागातील विकासकामांबद्दल सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, खासगी शाळेतील विद्यार्थी सरकारी शाळेत प्रवेश घेत आहेत. महात्मा फुले, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून पाच वर्षात 40 लाख गरीब जनतेला आरोग्य सेवा दिली. काही लहान मुलांना कमी ऐकू येते, ही मुले मुकबधीर होतात. हृदयाला छिद्र पडलेल्या मुलांचे ऑपरेशन शासनाने केले. 40 वर्षांचा मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला, धनगर समाजाला आरक्षण दिले नसले तरी एसटी प्रवर्गाच्या 22 योजना धनगर समाजाला लागू केल्या. मोदींच्या नेतृत्वात बलशाली हिंदुस्थान निर्माण होत आहे. कश्मीरचे 370, 35 ए कलम हटवून प्रथमच स्वातंत्र्यदिनी काश्मीरमध्ये तिरंगा झेडा फडकावून पाकिस्तानचे मनसुबे नेस्तनाबूत करण्यात आले, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या नावाची भारतरत्न पुरस्कारासाठी राज्य सरकार शिफारस करेल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार विनायकराव पाटील यांनी केले. सुत्रसंचालन राम तत्तापूरे, पुरुषोत्तम माने यांनी केले. अहमदपूर येथील महाजनादेश यात्रेच्या वेळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये युवक नेते डॉ. सिध्दार्थकुमार सुर्यवंशी,राष्ट्रवादीचे राम नरवटे, गोविंद गिरी सह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.