‘सीएए’चे समर्थन करताना फडणवीस रस्ता चुकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सत्ता गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे खरोखरच भरकटले आहेत याचा पुरावाच आज मिळाला. नागरिकत्व सुधारणा कायदा हा भाजपाचा कळीचा मुद्दा. या कायद्याविरुद्ध देशभरात आंदोलने सुरू आहेत. मुंबईतही आज आंदोलने झाली. एक विरोधात होते तर दुसरे समर्थनार्थ. विरोधक आझाद मैदानात होते आणि समर्थक ऑगस्ट क्रांती मैदानात. पण फडणवीस मात्र रस्ता चुकले. ऑगस्ट क्रांती मैदानाऐवजी ते ‘ऑनलाइन’ आझाद मैदानात पोहचले. तसे दस्तुरखुद्द त्यांनीच ट्विटरवर जगाला ओरडून सांगितले आहे.

नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदवही (एनआरसी) याच्या निषेधार्थ आज विविध शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात इन्कलाब मोर्चाचे आयोजन केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपा व इतर संघटनांनी या कायद्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी ऑगस्ट क्रांती मैदान ते गिरगाव चौपाटी अशा मोर्चाची हाक दिली होती. परंतु पोलिसांनी परवानगी नाकारल्याने ऑगस्ट क्रांती मैदानात मोर्चाचे आयोजन केले गेले. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चाला परवानगी नाकारली गेल्याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्य्कत केला. नागरिकत्व कायद्याला समर्थन देण्यापासून आम्हाला कुणीच रोखू शकत नाही असे ते म्हणाले.

फडणवीस यांनी ऑगस्ट क्रांती मैदानात पोहचताच प्रसिद्धीच्या हव्यासापोटी केलेले ट्विट त्यांच्या अंगलट आले. ऑगस्ट क्रांती मैदानाऐवजी त्यांनी आपण आझाद मैदानात पोहचलो असल्याचे त्यात नमूद केले होते. ट्विटर युजर्सनी त्यांना तातडीने त्यांची चूक लक्षात आणून दिली. त्यावर तत्परतेने फडणवीस यांनी आपले ट्विट डिलिट केले पण तोपर्यंत ते व्हायरल झाले होते. महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवणाऱया व्यक्तीला ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदान आणि आझाद मैदान यातील फरकही समजू नये हे महाराष्ट्राचेच दुर्दैव म्हणावे लागेल अशी चर्चा आता रंगली आहे.

केंद्रात ‘तुकडे तुकडे गँग’ सत्तेत – तुषार गांधी

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरात केंद्र सरकारचा निषेध केला जात आहे. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी हेसुद्धा आता त्यात सहभागी झाले आहेत. केंद्र सरकार चालवणाऱया पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा त्यांनी ‘तुकडे तुकडे गँग’ असा उल्लेख केला आहे. दिल्लीतील हिंसक आंदोलनाबाबत अमित शहा यांनी काँग्रेसवर टीका केली होती. काँग्रेस या कायद्याविरुद्ध लोकांना भडकवून तुकडे तुकडे गँगला हाताशी धरून दिल्लीतील शांतता भंग करत आहे असे शहा म्हणाले होते. त्याला तुषार गांधी यांनी शुक्रवारी ट्विटरवरून हे उत्तर दिले.

आझाद मैदानात ‘जॉइंट ऍक्शन कमिटी फॉर सोशल जस्टीस’च्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. त्यात जेएनयूमधील उमर खालिद आणि आफरीन फातिमा, जमिया मिलियामधील हमादा रहमान, अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील मकसूर उस्मानी या विद्यार्थी नेत्यांसह हजारो विद्यार्थी व कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. आयआयटी मुंबई, टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस (टिस) या संस्थांमधील विद्यार्थ्यांचाही त्यात समावेश होता. कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांनी यावेळी ढोल बडवून मोदी सरकारचा निषेध केला.